Pakistani Cricketers Criticize Shubman Gill : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा १-२ असा पराभव झाला आहे. ज्यामुळे आता भारतीय संघावर टीकेची झोड उठत आहे. मात्र, यात आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही उडी घेतली असून त्यांनी भारतीय कर्णधार शुबमन गिलवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. कामरान अकमल आणि बासित अली यांनी गिलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्याला चक्क “शाळेत जाऊन कप्तानी शिक” असा सल्ला दिला आहे. शान मसूदशी तुलना आणि कडक टीका – आपल्या ‘द गेम प्लान’ या यूट्यूब शोमध्ये बोलताना बासित अलीने शुबमन गिलच्या निर्णयांची तुलना पाकिस्तानचा फ्लॉप टेस्ट कॅप्टन शान मसूदशी केली. बासित म्हणाला, “गिलने केलेली कप्तानी ही अगदी शान मसूदसारखीच होती. मैदानावरील निर्णय तो स्वतः घेतो की बाहेरून येणाऱ्या मेसेजवर चालतो? त्याने आधी शाळेत जाऊन कप्तानीचे धडे गिरवले पाहिजेत.” कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजासारख्या अनुभवी फिरकीपटूंना बाजूला सारून नितीश रेड्डीसारख्या मध्यमगती गोलंदाजाला प्राधान्य दिल्यामुळे बासितने संताप व्यक्त केला. “गिलकडे कप्तानाचे डोके नाही” – कामरान अकमलने देखील गिलच्या रणनीतीवर ताशेरे ओढले. अकमल म्हणाला, “जेव्हा तुम्ही सुरुवातीला विकेट्स घेता, तेव्हा मुख्य गोलंदाजांना आक्रमणावर लावणे गरजेचे असते. हर्षित राणा धावा खर्च करत असताना त्याला संपूर्ण षटके देणे आणि जडेजा-कुलदीपचे ओव्हर कापणे हे चुकीचे आहे. कदाचित गिलकडे कप्तानाचे डोके (Captain’s Mind) नाही.” तसेच, बासित अलीने हा रवींद्र जडेजाचा शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना असू शकतो, असे भाकीतही वर्तवले. हेही वाचा – IND vs PAK : चाहत्यांसाठी ‘हा’ रविवार ठरणार ‘सुपर संडे’! एकाच दिवशी दोनदा होणार भारत-पाक हाय-व्होल्टेज महामुकाबला “बाबर आझमसारखीच चूक भारताने केली” – कामरान अकमलने बीसीसीआयला इशारा देताना म्हटले की, गिलला इतक्या लवकर कर्णधार बनवणे ही पाकिस्तानने २०१८ मध्ये बाबर आझमच्या बाबतीत केलेल्या चुकीसारखीच आहे. गिलला २०२७ च्या विश्वचषकापर्यंत रोहित शर्माच्या हाताखाली उपकर्णधार म्हणून शिकू द्यायला हवे होते, असेही अकमलने नमूद केले