कोलंबो – दित्वाह चक्रिवादळानंतर आलेला पूर आणि भूस्खलनामुळे संकटात सापडलेल्या श्रीलंकेला अनेक देशांमधून मदत दिली जात असताना पाकिस्तानने केलेल्या मदतीबद्दल श्रीलंकेत नाराजी आणि संताप व्यक्त व्हायला लागला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेत पाठवलेली औषधे मुदत उलटून गेलेली आणि जूनी असल्याचे उघड झाले आहे. पाकने पाठवलेले खाद्यपदार्थ आणि आवश्यक वस्तू देखील मुदत उलटून गेलेल्या असल्याचे श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांच्या ध्यानात आले आहे. दित्वाह चक्रिवादळानंतर पाकिस्तानने तातडीची मदत म्हणून जहाजातून पाठवण्यात आलेल्या मदत साहित्याची तपासणी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. औषधे, खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तू वापरण्याजोग्या नसल्याचे या तपासणीमध्ये आढळून आले आहे. ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि परराष्ट्र व्यवहार विषयक विभागाने देखील या विषयाची गंभीर दखल घेतली आहे. अत्यंत निकृष्ठ आणि उपयोगशून्य वस्तूंची मदत पाठवून श्रीलंकेच्या गरजेची चेष्टा केल्याची भावना आता स्थानिक अधिकारी बोलून दाखवू लागले आहेत. श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ या विषयीची आपली नाराजी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कळवली आहे. दूतावासाच्या माध्यमातून औपचारिकपणे याविषयीची नाराजी पाकपर्यंत पोचवली गेली आहे.