लाहोर – भारतातून पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील युवकाशी विवाह करणाऱ्या शीख महिलेला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. या महिलेला लाहोरमधील सरकारी केंद्रात ठेवण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. सरबजीत कौर असे या महिलेचे नाव असून गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अन्य २,८०० शीख यात्रेकरूंबरोबर ती नोव्हेंबर महिन्यात वाघा सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली होती. काही दिवसांनी हे धार्मिक यात्रेकरू भारतात परतले, पण कौर बेपत्ता होती. दरम्यान कौर हिने लाहोरपासून ५० किलोमीटर अतंरावरील शेखुपुरा गावातील नासिर हुसेन या युवकाबरोबर विवाह केला. पण नंतर या दोघांनी पोलीस आपल्याला त्रास देत असून वैवाहिक संबंध संपुष्टात आणण्यासाठी दबाव आणला जात असल्याची तक्रार लाहोर उच्च न्यायालयात दाखल केली होती. पोलिसांनी फारुकाबादेतील आपल्या घरावर छापा घातला असल्याचेही त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले होते. त्यानुसार लाहोर उच्च न्यायालयाने पोलिसांना या दाम्पत्याला त्रास न देण्याचे आदेश दिले होते. पण न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याऐवजी पोलिसांनी या दाम्पत्याला ताब्यात घेऊन कौर हिला लाहोर येथील दारुल अमन या सरकारी आश्रय केंद्रात दाखल केले, असे पंजाब सरकारमधील सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले. कौर हिला भारतात परत पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत. तिला भारतात पाठवण्याचा एक प्रयत्न यापुर्वीही केला गेला होता. पण वाघा-अटारी सीमा बंद असल्यामुळे अधिकाऱ्यांना त्यात यश आले नव्हते, असेही या सूत्रांनी सांगितले. दरम्यान सरबजीत कौर हिने इस्लामाबादेतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असून आपल्या व्हिसाला मुदतवाढ मिळण्यासाठीचा अर्ज केला आहे. तिने पाकिस्तानचे नागरिकत्व मिळण्यासाठीही अर्ज केला असल्याचे एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे. आपण घटस्फोटित असून नासिर हुसेनशी निकाह करण्यासाठीच पाकिस्तानमध्ये आल्याचेही तिने म्हटले आहे. नासिर हुसेनशी विवाह केल्यावर सरबजीत कौर हिने नूर असे मुस्लिम नाव धारण केले आहे. पण ती भारतीय गुप्तहेर असण्याची शक्यता आहे, अशा अर्थाची याचिका पंजाब विधानसभेचे माजी सदस्य महिंदर पाल सिंग यांनी लाहोर उच्च न्यायालयात दाखल केली होती. व्हिसाची मुदत संपल्यानंतर सरबजीत कौर हिने पाकिस्तानमध्येच रहाणे बेकायदेशीर आहे. तिच्या वास्तव्याविषयीचे प्रकरण पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचेही त्यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.