Thackeray brother : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम पत्रकार परिषद घेत काल सोमवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान केले जाणार असून, दुसऱ्या दिवशी लगेचच १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे हालचालींना वेग आला आला आहे. नगरपरिषद निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाणार असल्याचे अगोदरच सांगण्यात आले होते. या २९ महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेचाही समावेश असून, सर्वच राजकीय प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. आता या निवडणुका अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या असल्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची घोषणा दोन दिवसांमध्ये केली जाऊ शकते, अशी मोठी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आणि उद्धव ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही पक्ष या निवडणुकांसाठी एकत्र येण्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अनेकवेळा भेटी झालेल्या आहेत. उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील ठाकरे बंधूंच्या युती करणार असल्याचे संकेत वेळोवेळी दिलेले आहेत. अनेकदा ते बोलताना योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगत आले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने हीच तर योग्य वेळ आहे, असे बोलले जात आहे. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भूमिका देखील महत्वाची असणार आहे. दोघांचीही अधिकृत युती जाहीर झाल्यास काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी आघाडी असा निर्णय उद्धव ठाकरेंची शिवसेना घेऊ शकते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे दोन पक्ष असणार का, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पुढील आठवड्यात अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे युती आघाडीचा निर्णय तातडीने घ्यावा लागणार आहे. कारण अवघ्या एका महिन्यावर निवडणूक येऊन ठेपलेली आ आहे. असा आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम नामनिर्देशन पत्र स्वीकारणे : 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर अर्जाची छाननी : 31 डिसेंबर उमेदवारी माघारीची मुदत : 2 जानेवारी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी मतदान :15 जानेवारी निकाल :16 जानेवारी अॅड गुणरत्न सदावर्ते यांची टीका राज ठाकरे यांचा वैचारिक डीएनए लोकांनी पहिला आहे. ते दम येईपर्यंत माझे मनसैनिक असे म्हणतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे चालणारे गणित नाही. ते सखे भाऊ नव्हेत. ते चुलत भाऊ आहेत. युती काय सोयरीक आहे का? दोघांकडे पण काहीच नाहीये, अशी टीका अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना केली आहे. हेही वाचा : Pusegaon: पुसेगावच्या बैलबाजारात ‘हा’ नियम मोडल्यास थेट कायदेशीर कारवाई; ट्रस्टचा कडक इशारा