Naxalism : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद निर्मूलन मोहिमेअंतर्गत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. वाढत्या दबावासह राबविण्यात आलेल्या प्रभावी रणनीतींमुळे 29 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा घटनाक्रम परिसरात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले की, हे सर्व नक्षलवादी प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) संघटनेच्या आघाडीच्या संघटनांचे सक्रिय सदस्य होते. गोगुंडा भागातील माओवाद्यांची संघटनेचा प्रमुख पोडियाम बुध्रा याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते. गोगुंडा कॅम्पची स्थापना झाल्यानंतर या भागात सुरक्षा दलांची उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढली. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. सुरक्षा दलांकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या शोधमोहीम, क्षेत्रीय वर्चस्व (एरिया डॉमिनेशन) आणि इतर दबावात्मक उपाययोजनांमुळे प्रभावित होऊन या नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडत समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नववर्षांत ८ जानेवारी रोजी दंतेवाडा जिल्ह्यात ६३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते, तर ७ जानेवारी रोजी सुकमामध्ये २६ नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात प्रवेश केला होता. २०२५ मध्ये राज्यात १५०० हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.