राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल अचानकच एक बॉम्बगोळा टाकला. अमेरिकन संसदेतील एका अहवालावरून महिनाभरात भारतात मोठी खळबळ माजेल आणि देशाच्या पंतप्रधानपदी एक मराठी माणूस विराजमान होईल, असे थेट वक्तव्य त्यांनी केले आहे. त्या कथित अमेरिकन अहवालावरून मोदींना राजीनामा द्यावा लागेल असे वक्तव्य त्यांनी केले असते, तर ते एक वेळ राजकीय स्वरूपाचे वक्तव्य समजून दुर्लक्षित करता आले असते, पण पृथ्वीराज चव्हाण तेवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी महिनाभराचा अवधी सांगून टाकला आहे आणि पुढचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे हे वक्तव्य सनसनाटी निर्माण करणारे ठरले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे काही उथळ राजकीय नेतृत्व नाही किंवा त्यांचे कोणतेही वक्तव्य असे सहज दुर्लक्षित करता येण्यासारखे नसते. कालचे वक्तव्य तर अगदी थेट आणि निर्धारित कालावधीसह, तसेच पंतप्रधानाच्या नव्या पर्यायासह आले आहे. त्यामुळे त्यात काही अंशी तथ्य असावे असे कोणाच्याही मनात येऊ शकेल. जेफ्री एपस्टीन नावाच्या एका माणसाने दहा हजार पानांचा एक अहवाल अमेरिकन संसदेला सादर केला असून त्यावर तेथे चर्चा झाली आहे, पण तो तपशील अजून बाहेर आलेला नाही. जेव्हा तो बाहेर येईल त्यावेळी भारतात मोठ्या घडामोडी घडतील, त्यातून मराठी माणसाला पंतप्रधान पदाची संधी उपलब्ध होईल, असे ते म्हणाले आहेत. ज्या अर्थी त्यांनी थेट मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो असे विधान केले आहे, त्याचा अर्थ संघ भाजपाच्या अंतर्गत गोटात तशा हालचाली सुरू झाल्याचा सुगावा त्यांना लागला असावा, असेही त्यांच्या वक्तव्यातून सूचित होते आहे. काल कराडमध्ये आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे खळबळजनक विधान केले. वास्तविक हे विधान कराडमध्ये करण्याने त्याला फार महत्त्व मिळण्याची शक्यता नाही हे बहुदा त्यांनाही माहिती असावे, म्हणून त्यांनी हा आंतरराष्ट्रीय विषय असल्याने आपण त्या विषयावर मुंबई किंवा दिल्लीत अधिक भाष्य करू, असे विधान करून त्यांनी आणखी उत्सुकता ताणली आहे. काल कराडमध्ये जेव्हा ते पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी तिथे बहुतांशी ग्रामीण भागातील तालुका पातळीवरचे पत्रकार उपस्थित होते. पत्रकार परिषदेचा विषय कराड नगराध्यक्षपदाची निवडणूक आणि राज्यातील एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया हा होता. या विषयावर बोलत असताना त्यांनी मध्येच हे वाक्य ऐकवले. त्या वाक्याची संवेदनशीलता तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या पटकन लक्षात आली नाही, पण नंतरच्या गप्पा गोष्टीत एका चाणाक्ष पत्रकाराने या वक्तव्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांना पुन्हा या विषयावर बोलते केले त्यावर त्यांनी वरील भाष्य केले आहे. त्यांच्या विधानाचा सरळ अर्थ असा की महिनाभरात मोदी सत्तेवरून पायउतार होतील. पण सध्याची एकूण राजकीय परिस्थिती पाहता आणि देशाच्या राजकारणावरची मोदींची एकूण पकड पाहता असे काही घडेल याची सुताराम शक्यता कोणालाही वाटणार नाही. किंबहुना अमेरिकेने काहीही केले किंवा तिथल्या संसदेत कितीही खळबळजनक अहवाल सादर झाला तरी त्याला मोदी किंवा भाजप कसलीही धूप घालण्याची शक्यता नाही. मुळात ते अमेरिकेकडून होणार्या कुठल्याही कृतीवर कोणतेही भाष्य करीत नाहीत. त्याचवेळी ते ट्रम्प किंवा अमेरिकेला कोणतेही प्रत्युत्तरही देत नाहीत. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर अमेरिकन संसदेत दहा हजार नव्हे वीस हजार पानांचा जरी अहवाल सादर झाला तरी मोदी आजच्या घडीला सत्ता सोडतील हे अजिबात संभवत नाही. या राजकीय स्थितीची पृथ्वीराज चव्हानांना माहिती नसेल असेही म्हणता येत नाही. तरीही त्यांनी ठामपणे हे जे विधान केले आहे त्याबाबत आता त्यांच्याकडूनच अधिक खुलासा होणे महत्त्वाचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील वातावरण निर्मितीसाठी त्यांच्याकडून अशा एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावरील खळबळजनक विषयाचा आधार घेतला जाण्याची शक्यता नाही. तरीही त्यांनी हे विधान केल्याने त्यांना कुठल्यातरी बाबींचा सुगावा लागलेला असावा, म्हणूनच ते इतके खळबळजनक पण ठाम विधान करायला धजावले असावेत. कालच्या त्यांच्या या विधानावरून भाजपकडून तातडीने कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. एक-दोन दिवसात त्यावर भाजपचे लोक काहीतरी बोलतील किंवा पृथ्वीराज चव्हाणांचे विधान ते एकदम मोडीत काढतील अशी शक्यता आहे. पृथ्वीराजबाबा चव्हाणांचे आता वय झाले आहे, त्यामुळे ही सगळी दमलेल्या बाबांची कहाणी आहे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया भाजपकडून अपेक्षित आहेत. खरं म्हणजे त्या कालच यायला हव्या होत्या. ज्या अर्थी त्या तितक्या तातडीने आल्या नाहीत त्याअर्थी भाजपचे लोक पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानाने गडबडून गेले आहेत काय अशी शंका उपस्थित झाली आहे, अन्यथा चव्हाणांच्या या विधानाला मोडीत काढायला त्यांनी एवढा वेळ घेतला नसता. नरेंद्र मोदी हे आज राजकारणातील एका वेगळ्याच उंचीवर येऊन ठेपलेले नेतृत्व आहे, अगदी अलीकडे बिहारमध्ये तीन चतुर्थांश बहुमताने सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्या स्थानाला नजीकच्या भविष्यात तरी धक्का लागण्याची सुतराम शक्यता नाही. खुद्द मोदी यांचा आत्मविश्वास तर इतका प्रचंड असतो की त्यांनी यापूर्वी दोन वेळा अशी विधाने केली आहेत की सन 2047 मध्ये भारताला विकसित करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे आणि हे कार्य ईश्वरानेच आपल्यावर सोपवले आहे, असे ते जाहीरपणे म्हणाले आहेत. याचा अर्थ 2047 पर्यंत आपणच पंतप्रधान पदावर राहणार आहोत असे त्यांनी देशातील तमाम जनतेला सूचित केले आहे. हा इतका महत्त्वाकांक्षी आणि ठाम आत्मविश्वास असलेला नेता असल्या कुठल्यातरी अमेरिकन संसदेच्या अहवालावरून पायउतार होईल काय, हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे.