Pawandeep Rajan : इंडियन आयडल १२ चा विजेता झाल्यानंतर पवनदीप राजनला मोठी लोकप्रियता मिळाली. या शोमुळे त्याचा स्वतःचा एक मोठा चाहतावर्ग झाला. मात्र, त्याच्यासोबत घडलेल्या एका भयानक अपघातामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. वर्षाच्या सुरुवातीलाच पवनदीप याचा कार अपघात झाला होता. या अपघातात त्याच्यावर काय परिस्थिती ओढवलेली होती, याबाबत त्याने एका मुलाखतीत अंगावर काटा आणणारा खुलासा केला आहे. हा अपघात इतका भयानक होता की, अपघातामुळे त्याच्या शरीरावर बरेच फ्रॅक्चर होते. त्यातून बरं होण्यासाठी त्याला काही महिन्यांचा कालावधी लोटला. ज्यावेळी त्याच्या कारचा अपघात झाला होता, त्यावेळी कारला आग लागली, पण कोणीही मदतीला आले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला बाहेर काढले, अशी आठवण पवनदीपने भयानक कार अपघाताची सांगितली. त्याच्यासोबत घडलेल्या या भयानक अपघाताविषयी पवनदीप पहिल्यांदाच सलीम सुलेमानच्या पॅाडकास्टवर बोलला आहे. 5 मे 2025 रोजी सकाळी उत्तराखंडहून दिल्लीला एका कार्यक्रमासाठी अहमदाबादला विमान पकडण्यासाठी जात होतो. पण, मुरादाबादजवळ, ड्रायव्हरचा चुकून डोळा लागला आणि गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली, असे त्याने सांगितले. पुढे तो म्हणाला, मी तिथेच बसलो होतो, माझा दरवाजा उघडत नव्हता आणि फक्त एक हात काम करत होता. मी लोकांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत मागत होतो, असे त्याने अपघाताची आठवण काढत सांगितले. मी किती वेळ आत होतो हे मला माहित नाही, पण जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी गाडीतून बाहेर पडलो. त्यानंतर मला रुग्णालयात नेण्यात आले. माझे दोन्ही पाय आणि एक हात तुटला होता. मी घरी फोन केला आणि माझ्या कुटुंबाला येण्यास सांगितले. त्यावेळी फक्त शक्य तितक्या लवकर उपचार मिळावेत हेच माझ्या डोक्यात होते. आता सर्व काही ठीक आहे, असे त्याने बोलताना सांगितले. अपघातानंतर सुरुवातीला पवनदीपला स्थानिक रुग्णालयात आणि नंतर दिल्ली-एनसीआरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॅाक्टरांनी गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया केल्या. अपघातानंतर महिनाभर अंथरुणाला पवनदीप खिळून होतो. हळूहळू चालायला सुरुवात केली. त्यानंतर गिटार वाजवण्यासही सुरुवात केली, असे त्याने सांगितले. माझा हात थोडा बरा झाला आहे, पण तो अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही, असे तो म्हणाला. हेही वाचा : “राजकीय नेत्यांना काय वाटते यापेक्षा…”; होणाऱ्या टीकेवर राज्य निवडणूक आयोगाचे चोख प्रत्युत्तर