Municipal Corporation Election 2026 : राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना मुंबई निवडणूक विभागाने एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त निर्णय घेतला आहे. प्रचाराचा अधिकृत कालावधी संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघर प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. मात्र, याच दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना 15 जानेवारीपर्यंत घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रचाराची अधिकृत वेळ संपल्यानंतरही प्रत्यक्ष प्रचार सुरू राहणार आहे. ही परवानगी मुंबई महानगरपालिकेतील ए, बी आणि ई विभागांपुरती मर्यादित असून, याबाबतचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या राजकीय पक्ष व उमेदवारांच्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये नमूद करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती. मात्र, या काळात उमेदवारांना कोणत्याही प्रकारची पत्रके, फ्लायर्स किंवा प्रचार साहित्य वाटण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. केवळ थेट संवाद साधत घरोघर भेट देण्याचीच मुभा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्यात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही निवडणुकीत मतदानाच्या 48 तास आधी प्रचार पूर्णपणे थांबवला जातो. मात्र, यावेळी घेतलेल्या या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आगामी काळात या निर्णयावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.