मुंबई – मुंबईतील पहिल्या आणि महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो-३ सेवेला आज पुन्हा तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. दक्षिण मुंबईतील सीएसएमटी स्थानकाजवळ भुयारात मेट्रो काही काळासाठी बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले. मेट्रोच्या दरवाजांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते वारंवार उघड-बंद होत होते. यामुळे खबरदारी म्हणून मेट्रो काही वेळ थांबविण्यात आली होती. त्यामुळे या बिघाडाचा परिणाम संपूर्ण मार्गिकेवरील मेट्रो सेवांवर झाला. ही घटना सीएसएमटी स्थानकावर घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कफ परेडला जाणारी मेट्रो स्थानकावर उभी असताना प्रवाशी मेट्रोत बसले होते. मात्र, मेट्रोचे दरवाजे सतत उघड-बंद होत असल्याने तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. मेट्रोचे दरवाजे बंद न झाल्यामुळे मेट्रो जागीच थांबवण्यात आली. तांत्रिक पथकाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याची माहिती असून, मेट्रो सेवा लवकरच सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजीही कफ परेड स्थानकाजवळ अशाच प्रकारचा तांत्रिक बिघाड झाला होता. वारंवार होणाऱ्या अडचणींमुळे मेट्रो-३च्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.