मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात बेकायदेशीर डान्स बारविरोधात कारवाई वेगाने सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट एकने माझगाव येथील डायमंड डोअर बार अँड रेस्टॉरंटवर छापा टाकून नियमबाह्य आणि अश्लील नृत्यप्रकार उघडकीस आणला. या कारवाईत बार चालक, कर्मचारी, बारबाल आणि ग्राहकांसह एकूण 15 जणांना अटक करण्यात आली आहे. नवाब टँक रोडवरील खान बिल्डिंगमधील या बारमध्ये मोठ्या आवाजात संगीत सुरू असून महिलांकडून चित्रपटातील गाण्यांवर नृत्य सादर केले जात होते. ग्राहकांकडून बारबालांवर चलनी नोटा उधळल्या जात असल्याचेही आढळून आले. छाप्यादरम्यान सुमारे 75 हजार रुपयांची रोख रक्कम, संगीत उपकरणे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. तपासात बारचा परवाना वेगळ्याच नावावर असल्याचे, स्टेज आणि ग्राहकांमधील आवश्यक अंतर न राखल्याचे तसेच परवानगीपेक्षा जास्त कलाकार उपस्थित असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, निवडणूक काळात अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.