Mohan Bhagwat | PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे नेतृत्व कोण करणार, याबद्दलची चर्चा पुन्हा एकदा गतीमान झाली आहे. मात्र भाजपने यापूर्वीच जाहीर केले आहे की 2029 ची लोकसभा निवडणूकही मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला, “मोदीजींनंतर पुढचा पंतप्रधान कोण?” भागवत यांनी अतिशय संयत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा प्रश्न माझ्या अधिकारक्षेत्राबाहेरचा आहे. यावर मत देणे योग्य नाही. मी फक्त शुभेच्छा देऊ शकतो.” असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी अधिक स्पष्ट करीत सांगितले, “मोदीजींनंतर देशाचे नेतृत्व कोण करणार, हे ठरवण्याचा अधिकार मोदीजी आणि भाजपचा आहे.” अलीकडे भाजपच्या कथित “रिटायरमेंट पॉलिसी”मुळे पुढचे चेहरे कोण असतील, यावर चर्चा रंगत होती. मात्र भाजपच्या भूमिकेने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पीएम मोदी यांनी नुकताच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला आहे. “2029 मध्येही भाजपाचे नेतृत्व तेच करणार” – देवेंद्र फडणवीस एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “यावर इतर कोणाचा विचार करण्याची गरजच नाही. पंतप्रधान मोदी पूर्णपणे तंदुरुस्त आहेत आणि 2029 मध्येही भाजपाचे नेतृत्व तेच करणार आहेत.” असं यावेळी फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी मोदींच्या कार्यशैलीची प्रशंसा करताना सांगितले : “पंतप्रधान मोदीजी 40 वर्षांच्या व्यक्तीपेक्षा जास्त कष्ट करतात.” “ते दिवसाचे 17 तास काम करतात आणि मीटिंगमध्ये कधीही थकलेले दिसत नाहीत.” “ते शरीराने आणि मनाने पूर्णपणे सक्षम आहेत तोपर्यंत दुसऱ्या पर्यायाचा प्रश्नच नाही.”