मुंबई : आमदार सुनील गोविंद शिंदे यांचे यादीत 7 वेळा नाव आले आहे. त्यांचे वय, फोटो वेगळे आहेत. तर श्रद्धा जाधव यांचे नाव 8 वेळा आल्याने निवडणूक आयोग तुम्ही सर्कस करत आहात का? असा संतप्त प्रश्न करत, ठाकरेसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, 20 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेची प्रारूप मतदार यादी आली. त्यानंतर मोठा गोंधळ समोर आला आहे. मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहेत. 3 ते 4 हजार ऑबजेक्शन आम्ही घेतले. निवडणूक आयोगाची आम्ही भेट घेऊन पत्र दिले. आम्ही स्वतः या यादीवर काम करत आहोत. 5 लाख 86 हजार लोकांची दुबार मतदार म्हणून नोंदणी आहे. यामध्ये आता असे काही लोक आहेत, जे दुबार आहेत पण त्यांच्या समोर स्टार नाही. मृत मतदारांचे डेथ सर्टिफिकेट देऊन सुद्धा मतदार यादीत नावे आहेत. त्यांच्या नावावर कोण खोटे वोटिंग करतेय का? या सगळ्याचे उत्तरे देणार कोण? पण, एक चळवळ आम्ही यासाठी उभी करणार आहोत. 1 जुलै 2025 नंतर एकही मतदार यादीमध्ये येऊ शकत नाही. पण, आता या यादीमध्ये 33 हजार मतदार हे नव्याने आले असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाकडून दाखवलेले 14 लाख दुबार मतदार काढले जातील. आमचे आमदार सुनील शिंदे यांचे यादीत 7 वेळा नाव, तर श्रद्धा जाधव यांचे नाव 8 वेळा आले आहे. ज्योती गायकवाड आणि अनिल देसाई यांचे नाव सुद्धा दुबार मतदारांमध्ये आले आहे. दुबार मतदारांमध्ये मराठी मतदारांची नावे अधिक आहेत. पुढचे दोन दिवस अजून आमच्याकडे आहे. बीएलओ म्हणून कोण येतो, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, असे लोक मतदार तपासणी करत आहेत. आम्ही निवडणूक आयोगाला विचारात आहोत तुम्ही काय करत आहात? थट्टा करत आहात, तुम्ही सर्कस करत आहात का?. हा घोळ तुम्हीच घातलेला असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.