Mitchell Starc on DRS Controversy : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना सध्या तंत्रज्ञानाच्या वादामुळे चर्चेत आला आहे. अॅडलेड ओवल येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ‘डिसीजन रिव्ह्यू सिस्टम’ (DRS) मध्ये झालेल्या एका तांत्रिक चुकीमुळे ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरीला जीवदान मिळाले. या संधीचे सोने करत कॅरीने शानदार शतक ठोकले, मात्र यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तंत्रज्ञानाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिचेल स्टार्कची आयसीसीकडे मागणी – ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सामन्यानंतर बोलताना स्टार्क म्हणाला की, “आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डीआरएस सारख्या महत्त्वाच्या आणि महागड्या तंत्रज्ञानाचा खर्च वैयक्तिक बोर्डांऐवजी आयसीसीने (ICC) उचलायला हवा.” स्टार्कच्या मते, जेव्हा तंत्रज्ञानात त्रुटी राहतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम खेळाच्या संतुलनावर होतो. जर एकाच कंपनीने जगभरातील सर्व मालिकांमध्ये तंत्रज्ञान पुरवले, तर निर्णयांमध्ये समानता आणि अचूकता टिकून राहील. तंत्रज्ञानातील तफावत आणि खेळाडूंचा संभ्रम – स्टार्कने केवळ खर्चावरच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या गुणवत्तेवरही भाष्य केले. प्रत्येक मालिकेत वेगवेगळी उपकरणे वापरली जात असल्याने निर्णयांमध्ये तफावत आढळते. यापूर्वी तिसऱ्या कसोटीतही स्टंप माईक आणि ‘स्निको’ तंत्रज्ञानाबाबत वाद निर्माण झाला होता. स्टार्कने स्पष्ट केले की, तांत्रिक चुकांमुळे खेळाडू आणि चाहते दोघांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण होते, जे खेळाच्या दृष्टीने घातक आहे. हेही वाचा – Shardul Thakur : लॉर्ड शार्दुल ठाकूर बनला बापमाणूस! नवीन वर्षापूर्वी चाहत्यांना दिली गोड बातमी! कर्णधार पॅट कमिन्सची प्रतिक्रिया – ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही स्टार्कच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. कमिन्स म्हणाला की, “रिअल टाइम स्निको आणि अल्ट्रा एज यांच्यात अनेकदा फरक जाणवतो. परदेशी तंत्रज्ञान येथे वेगळ्या पद्धतीने काम करते. जेव्हा चेंडू बॅटला लागलेला नसतो, तेव्हाही अल्ट्रा एजवर स्पाइक दिसण्याची भीती फलंदाजाला असते.” हेही वाचा – Rohit Sharma : “मला सगळं संपलं वाटलं, निवृत्ती घेणार होतो पण…”, हिटमॅन ‘त्या’ पराभवानंतर घेणार होता मोठा निर्णय अखेरीस पंचांचा निर्णय अंतिम असतो, परंतु सिस्टीमने अचूक काम करणे ही काळाची गरज असल्याचे त्याने नमूद केले. अॅडलेड कसोटीतील या प्रकरणामुळे आता आयसीसी तंत्रज्ञानाच्या मानकीकरणाबाबत (Standardization) काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.