Manikrao Kokate : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना दोन वर्षांची शिक्षा व ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता कोकाटे यांचे मंत्रिपद तसेच आमदारकी धोक्यात आली आहे. कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून कोकाटे यांचे मंत्रिपद जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदासह आमदारकीही धोक्यात आली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात. कोकाटेंची आमदारकीही जाणार? लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, एखाद्या लोकप्रतिनिधीला २ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी शिक्षा झाली तर ती व्यक्ती तात्काळ अपात्र ठरते. माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झालेली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे मंत्रिपदावर राहण्यास पात्र नाहीत. तसेच ते अपात्र असल्याने त्यांची आमदारकीही जाणार आहे. अशा प्रकरणातील व्यक्तीला शिक्षा पूर्ण झाल्यानंतर ६ वर्षे निवडणूक लढवता येते नाही. मात्र, हायकोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तर त्यांची आमदारकी वाचू शकते. धनंजय मुंडेंची आमदारी अबाधित दरम्यान, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनाही काही महिन्यांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसोबत संबंध असल्याच्या कारणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र त्यांची आमदारी अबाधित आहे. धनंजय मुंडे यांच्यावर भाष्टाचारचे किंवा अन्य कोणताही थेट आरोप नव्हते. त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले नव्हते. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदी त्यांच्यासाठी लागू नव्हत्या. त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता. मात्र कोकाटेंना न्यायालने शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. तर माणिकराव कोकाटेंची अटक टाळू शकते जर सजाप्राप्त आरोपी पोलिसांच्या संपर्कात असेल आणि सरेंडर होण्यासाठी त्याने पुराव्यासहित सबळ कारणे दिली असतील अटक काही दिवस टळू शकते. वैद्यकीय कारण हे अत्यंत सबळ कारण मानलं जाते. मात्र त्या आरोपीवर सुरू असलेले उपचार आणि हॉस्पिटल अहवाल हा महत्वाचा घटक मानला जातो. लीलावती हॉस्पिटलचा, नाशिक पोलिसांना सादर होणारा प्रकृती अहवाल हा यात महत्त्वाचा ठरणार आहे. कोकाटे यांच्या आरोग्य अहवालाच्या आधारावर नाशिक पोलीस काही दिवस अटक टाळू शकतात. अर्थात हॉस्पिटल अरेस्ट हा एक मार्ग असला तरी त्याची अंमलबजावणी ही पूर्णपणे नाशिक पोलिसांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. माणिकराव कोकाटे याना कोणत्याही परिस्थितीत अजून दोन दिवस अटक टाळायची आहे. १९ डिसेंबरला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला नाही तर त्यांना सरेंडर व्हावे लागेल किंवा पोलिस हॉस्पिटल अरेस्ट करू शकतील.