Amit Shah – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी आता तयार रहावे. एनडीएने बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर पुढचा नंबर त्यांच्या राज्यांचा आहे, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. भाजप, जेडीयू आणि मित्रपक्षांचा समावेश असणाऱ्या एनडीएने नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. त्यामुळे उत्साह दुणावलेला भाजप पुढील वर्षी काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज झाला आहे. बंगाल, तमिळनाडूतील निवडणुका ४ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या घडामोडींचा संदर्भ देऊन शहा रविवारी गुजरातमधील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी बंगाल आणि तमिळनाडूतही एनडीएला विजय मिळण्याचे भाकीत केले. भाजपच्या विजयाचे सत्र वर्ष २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपासून सुरू झाले. ते २०२५ यावर्षापर्यंत कायम आहे. भाजपच्या विजयी घोडदौडीमुळे कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्र, हरियाणा, दिल्लीपाठोपाठ बिहारमध्ये नेस्तनाबूत झाला, असे शहा पुढे बोलताना म्हणाले. त्यांनी कथित मतचोरीचा मुद्दा लावून धरणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. बिहारमध्ये एनडीएने तब्बल दोन-तृतीयांश बहुमत मिळवले. त्यानंतरही राहुल मतदारयाद्या, इव्हीएमलाच दोष देत आहेत. खरेतर, देशातील जनता कॉंग्रेस आणि मित्रपक्षांना नाकारत आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली.