Violence in Assam : ईशान्य भारतातल्या आसाममध्ये कार्बी आंगलोंगमध्ये पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला. जमावाला पांगण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावेळी जमावाने तीन दुचाकींना आग लावली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता हा हिंसाचार इतर जिल्ह्यांमध्येही पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आसामच्या पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील चराई जमिनींवर बेकायदेशीरपणे कब्जा करणाऱ्यांना हटवण्यासाठी आंदोलन सुरु होते. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बीएनएसचे कलम 163 लागू केले आहे. पुढील आदेशापर्यंत हे कलम लागू असणार आहे. हा निर्णय असामाजिक घटकांना जातीय किंवा सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यापासून रोखण्यासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी घेण्यात आला आहे. पोलिस, निमलष्करी दल आणि कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे. आंदोलकांच्या मागण्या काय आहेत? आंदोलकांनी व्हिलेज ग्राझिंग रिझर्व्ह (व्हीजीआर) आणि प्रोफेशनल ग्राझिंग रिझर्व्ह (पीजीआर) जमिनींवर बेकायदेशीर कब्जा करणारांना बाहेर काढण्याची मागणी केली आहे. यातील बहुतेक लोक बिहारमधील आहेत. या आंदोलनात 22 तारखेला आंदोलकांनी कार्बी आंग्लोंग ऑटोनॉमस कौन्सिल (केएएसी) चे मुख्य कार्यकारी सदस्य (सीईएम) तुलीराम रोंगांग यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली होती, त्यामुळे हे आंदोलन चिघळले आहे.