नाशिक : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची ताकद वाढली असून, राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या राजकीय समीकरणांमध्ये हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. नितीन भोसले हे नाशिकच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व मानले जातात. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला भगवा नितीन भोसले यांच्यासोबत त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशनचे सचिव राजेंद्र लिंबाळते, नाशिक ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचे प्रशांत ठाकरे, तसेच युवराज भोसले, सचिन सोनवणे, प्रसाद आंबेकर, अनुप भोसले आणि पृथ्वीश भोसले यांचा समावेश आहे. या इनकमिंगमुळे नाशिकमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी माजी महापौर अशोक मुर्तडक आणि दशरथ पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. हे दोघे काही काळापूर्वी भाजपमध्ये सहभागी झाले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे अशोक मुर्तडक यांनी शिवसेनेची वाट धरल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे नाशिकचे राजकारण ढवळून निघाले असून, महापालिका निवडणुकीत आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.