BMC Election Result : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’ने मुंबईवर भगवा फडकवत उद्धव ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. या विजयासोबतच महायुतीने आपल्या वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची तयारी सुरू केली असून, मुंबईतील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. लाडक्या बहिणींना ‘बेस्ट’ गिफ्ट! महायुतीने आपल्या ११ जानेवारी रोजी जाहीर केलेल्या वचननाम्यात महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला होता. आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे, मुंबईतील महिलांसाठी खालील मोठे निर्णय लागू होतील. प्रवासात ५०% सवलत: मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या ‘बेस्ट’ (BEST) बसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. आर्थिक लाभ: ‘लाडकी बहीण’ योजनेचे दरमहा १,५०० रुपये मिळत असतानाच, आता बस प्रवासातील अर्ध्या तिकीटामुळे महिलांची दरमहा मोठी बचत होणार आहे. बस संख्येत वाढ: वचननाम्यानुसार, २०२९ पर्यंत बेस्टच्या ताफ्यातील बसेसची संख्या ५,००० वरून १०,००० करण्यात येणार असून सर्व बसेस इलेक्ट्रिक (EV) असतील. “संपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत..” – संजय राऊत खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, “मुंबई महापालिका निकाल..! संपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत, ६० ते ७५ प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून जे निकालाचे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरणार आहेत. लढत अटी तटीची आहेच पण शिवसेना एम न से टक्कर देत आहे! भाजपा आकड्यांचा भ्रम पसरवत आहे! दुपार नंतर शिवसेना मनसे चे असंख्य उमेदवार विजयी झाले आहेत! पण न्यूज़ चैनल जुनाच आकडा दाखवीत आहेत! पाहू….” असं त्यांनी म्हंटलं आहे.