Maharashtra Voting Rada : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचे पहील्या टप्प्यातील मतदान सुरू असताना अनेक ठिकाणी सलग राड्यांच्या घटना घडल्याने निवडणुकीचे वातावरण तणावपूर्ण बनले होते. राज्यात बीड, मनमाड, येवला, गेवराई, सटाणा आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रतिस्पर्धी कार्यकर्ते आमनेसामने आल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. येवल्यात राष्ट्रवादी(अप) आणि शिवसेनेत वाद येवल्यातील सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अप) आणि शिंदेसेना समर्थकांमध्ये राडा झाला आहे. मतदान केंद्रात येण्या जाण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे पहायला मिळाले. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांंत केले. यावेळी मतदान केंद्राबाहेर तणाव निर्माण झाल्याने पोलिस कर्मचारी तैनात केले. गेवराईमध्ये भाजप, राष्ट्रवादीत राडा गेवराई शहरातील स्थानिक नगरपरिषदेच्या निवडणूकीत भाजप व राष्ट्रवादी अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून त्यानंतर भाजप नेत्याच्या घराबाहेर दगडफेक करण्यात आली आहे. या हाणामारीनंतर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी लाठीमार देखील केला. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित व भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या समर्थकांमध्ये वार्ड क्रमांक 10 मधील बूथवर जोरदार वाद झाल्यानंतर, वादाचे रुपांतर हणामारीत झाले. पोलीसांनी प्रकरण शांत केल्यानंतर मतदान सुरुळीत पार पडले. त्र्यंबकमध्ये पोलीस आणि प्रतिनिधींमध्ये वाद त्र्यंबकेश्वरमध्ये नूतन त्र्यंबकेश्वर विद्यालय मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून पोलिस आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले. वाद चिघळू लागल्याने मतदान केंद्राबाहेर तणाव पसरला होता. काही काळानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. मनमाडमध्ये भाजप, शिंदे समर्थक भिडले मनमाडमध्ये नेहरू भवन मतदान केंद्राजवळ प्रभाग क्रमांक 11 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवाराने आरोप केल्यानंतर दोन्ही गट भिडले. भाजप आणि शिदेंसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक वाद पेटल्याने धक्काबुक्की सुरू झाली. या गोंधळात भाजपचे उपाध्यक्षही धक्काबुक्कीला सामोरे गेले. यामुळे मतदाम केंद्रांवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मतदारांची पळापळ झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. सटाण्यात मतदान केंद्राजवळ वाद सटाण्यातही निवडणुकीदरम्यान जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळील मतदान केंद्र क्रमांक 10 जवळ अन्य कारणातून अचानक दोन गटांमध्ये राडा झाला. घरगुती वादातून सुरू झालेला हा वाद मतदान केंद्राजवळ घडल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. राड्यातील काही सहभागी थेट पोलिस ठाण्यात पोहोचले होते. अपक्ष उमेदवाराचे स्वत:चेच मतदान हुकले मुक्ताईनगर नगरपरिषदेच्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार ज्योती भालेराव यांना स्वत:लाच मतदानाचा हक्क बजावता आला नाही. संध्याकाळी साडेपाच वाजता त्या मतदान केंद्रावर पोहोचल्या होत्या, मात्र मतदानावाची वेळ संपल्याने त्यांना प्रवेशच नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या कर्यकर्त्यांनाही मतदान करता आले नाही. उमेदवार असून देखील वेळेवर मतदान केंद्रावर पोहचू न शकल्याने स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त करताना विविध चर्चांना सुरुवात केली आहे.