महाराष्ट्रातील नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगर परिषदा आणि नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कौल सत्ताधारी महायुतीच्या बाजूनेच गेल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढत असले तरी राज्यातील नागरी भागातील मतदारांनी या तीन पक्षांवर विश्वास दाखवला आहे असेच दिसते. राज्यातील एकूण 288 नगरपंचायती नगरपरिषदांसाठी झालेल्या मतदानामध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांनी 288 पैकी 225 च्या आसपास नगराध्यक्षच्या निवडणुका जिंकल्या आहेत, तर राज्याच्या सुमारे 6,800 नगरसेवक पदांपैकी 4000च्या आसपास जागा जिंकल्या आहेत. राज्यातील प्रमुख नेत्यांनी आपले गड राखण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या निमित्ताने केला असला, तरी काही प्रमुख नेत्यांना धक्का देण्याचे कामही मतदारांनी केले आहे. रायगडसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांनाच माहीत असला तरी या निवडणुकीच्या निमित्ताने गोगावले यांनी तटकरे यांच्यावर मात केल्याचे दिसून आले. तटकरे यांच्या गडावर आता गोगावले यांची सत्ता आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण नगर परिषदेची निवडणूकही गाजली होती. गेली 35 वर्षे सत्तेवर असलेल्या रामराजे गटाला बाजूला करून भाजपने आपली सत्ता मिळवली आहे. कोकणातील सिंधुदुर्गमधील कणकवली मालवण भागातील निवडणूकही गाजली. नारायण राणे यांचे दोन सुपुत्र आमदार एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याने या निकालाबाबत उत्सुकता होती. कणकवलीच्या नगराध्यक्षपदी सर्वपक्षीय उमेदवार असलेले संदेश पारकर निवडून आले आहेत आणि तो मंत्री नितेश राणे यांच्यासाठी मोठा धक्का आहे; तर नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बाजी मारलेली दिसते. पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपला ईश्वरपूरचा गड राखला आहे. पण सांगली जिल्ह्यामध्ये मात्र भाजपाने मुसंडी मारली आहे. एकूणच राज्यात सर्वत्रच महायुतीच्या घटक पक्षांनी आपला प्रभाव वाढवण्याचे काम या निवडणुकीच्या निमित्ताने केले आहे. या निवडणुकीच्या प्रचारावर जर नजर टाकली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी ज्या धडाडीने राज्यात नगरपालिका निवडणुकीचा प्रचार केला होता ती धडाडी आणि पुढाकार विरोधी पक्षांच्या एकाही नेत्याला दाखवता आली नाही. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त जाहीर सभा घेतल्या होत्या. पण काँग्रेसची, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी या पक्षांचे नेते मात्र आपापल्या गडाच्या बाहेर पडून पक्षाच्या विजयासाठी प्रचार करताना दिसले नाहीत. त्याचाच फटका या निवडणुकीत बसला असावा. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी जसा पाठिंबा महायुतीला दिला होता तशाच प्रकारचा पाठिंबा या निवडणुकीतही दिल्याचे दिसते. योगायोगाची गोष्ट म्हणजे नगराध्यक्षपदाचे उमेदवारही 288 होते आणि विधानसभेच्या जागांची संख्याही 288 आहे. एकूण निकालावर नजर टाकली तर महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये साधारण 235 पर्यंत बाजी मारली होती, तेवढेच नगराध्यक्ष साधारणपणे महायुतीचे निवडून येतील अशीही लक्षणे दिसत आहेत. अधिकच कोणत्यातरी अनावश्यक गोष्टींच्या माध्यमातून पराभवाचे विश्लेषण न करता आपण निवडणूक यंत्रणा राबवण्यास कमी पडलो याची कबुली आता विरोधी पक्षांनी द्यायला हवी. लवकरच राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये निवडणूक होणार आहे. तेथील मतदार तर महानगरांमधील मतदार आहेत. महानगरपालिका निवडणुकांमध्ये जर नियोजनशून्य पद्धतीने विरोधी पक्ष निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांना तेथेही मोठा धक्का बसेल. नगरपालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते अशा प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. पण या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेत्यांचा पुढाकार महत्त्वाचा असतो हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे. आपण जर एकत्र लढलो तर आपल्याला अधिक चांगले यश मिळू शकते याचा दाखला या निवडणुकीने महायुतीच्या नेत्यांनाही दिला आहे. निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष जास्त बळकट झालेले दिसतात. भाजपानेसुद्धा आपला पाया अधिक मजबूत केला आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी या पक्षांवर नगरांमधील जनतेने विश्वास दाखवला असल्याने या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्यांनी मनापासून पूर्ण करायला हवी.