पिंपरी – निगडी येथील दुर्गा देवी टेकडी परिसरात तलावाजवळ बिबट्याचा वावर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दुर्गा टेकडी तात्काळ बंद करण्यात आली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड शहरातील वन्यजीव-सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक मानली जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याने कुत्रा किंवा अन्य प्राणी भक्ष्य केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळूनही पोलीस यंत्रणा उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून नागरिकांना टेकडी परिसरात प्रवेशास मनाई केली आहे. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली असली तरी अद्याप त्याला पकडण्यात यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वन क्षेत्रपाल, शिवाजीनगर कार्यालय यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी पिंजरे बसवावेत, ड्रोन व नाइट-व्हिजन कॅमेऱ्यांचा वापर करावा आणि शोधमोहीम अधिक तीव्र करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही पिंपरी-चिंचवड परिसरात दोन वेळा बिबट्यांना पकडण्यात आले आहे. त्यातील एका बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.