नवी दिल्ली – आरसीटीसी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत लालू यादव यांच्यावरील खटल्याला सध्या स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच कथित आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर आरोप निश्चित करणाऱ्या आदेशाला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर सीबीआयला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. लालू यादव यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने १३ ऑक्टोबर रोजी लालू-राबडी आणि तेजस्वी यादव यांना आयआरसीटीसी घोटाळ्यात आरोपी मानले आहे. हे प्रकरण त्यावेळचे आहे जेव्हा लालू प्रसाद यादव केंद्र सरकारमध्ये रेल्वे मंत्री होते. आरोप आहे की, त्यांच्या कार्यकाळात आयआरसीटीसीअंतर्गत काही हॉटेल्स आणि त्यांच्याशी संबंधित जमिनी खासगी कंपन्यांना नियमांकडे दुर्लक्ष करून भाडेपट्टयावर देण्यात आल्या. तपास यंत्रणांचा दावा आहे की, या प्रक्रियेत पारदर्शकतेचे पालन केले गेले नाही आणि यामुळे काही खासगी कंपन्यांना अयोग्य फायदा झाला. दरम्यान, न्यायालयाने पुढील सुनावणी बुधवार, दि. १४ जानेवारी रोजी निश्िचत केली आहे.