Ladki Bahin Yojana – राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले होते. मात्र, दिलेल्या मुदतीपर्यंत राज्यातील २ कोटी ४७ लाख महिलांपैकी १ कोटी ८० लाख महिलांनी ई-केवायसी केली, तर तब्बल ६७ लाख महिलांनी ई-केवायसी न केल्यामुळे अखेर त्या आता लाडकी बहिणीच्या लाभापासून कायमच्या वंचित राहणार आहेत. महिला व बालविकास विभागातील अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात एकूण २ कोटी ४७ लाख महिला पात्र होत्या. त्यापैकी केवळ १ कोटी ८० लाख महिलांनीच विहित मुदतीत ई-केवायसी केली आहे. उर्वरित ६७ लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्या आता या लाभापासून मुकणार आहेत. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवरील भार काही प्रमाणात कमी होईल. निवडणूक आणि तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते प्रलंबित होते. त्यापैकी नोव्हेंबरचा हप्ता १ जानेवारीपासून बहुतांश महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात आता १५०० रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२४ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. सुरुवातीला तब्बल २ कोटी ६२ लाख अर्ज दाखल झाले होते. मात्र, छाननीमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या. गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील सुमारे २ कोटी महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महीना १५०० रुपये जमा होता.