मुंबई : अभिनेत्री क्रिती सनॉनची धाकटी बहीण नुपूर सनॉन हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. आपल्या लाडक्या बहिणीला वधूच्या रुपात पाहून क्रिती प्रचंड भावूक झाली आहे. तिने सोशल मीडियावर लग्नाचे काही खास फोटो शेअर करत आपल्या मनातील भावनांना वाट करून दिली आहे. ‘५ वर्षांची असताना तिला पहिल्यांदा कडेवर घेतलं होतं…’ आपल्या पोस्टमध्ये क्रितीने बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने लिहिले की, “मी सध्या जे अनुभवत आहे, ते व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. अजूनही माझा विश्वास बसत नाहीये की माझ्या छोट्या बहिणीचं लग्न झालं आहे! जेव्हा मी ५ वर्षांची होते, तेव्हा तिला पहिल्यांदा कडेवर घेतलं होतं. तिथून सुरू झालेला हा प्रवास तिला जगातील सर्वात सुंदर वधू म्हणून पाहण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे, हे पाहून मन भरून आलंय.” लग्नातील विधी आठवत क्रितीने पुढे लिहिले की, “तुम्हा दोघांना लग्नाचे वचन घेताना पाहणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात भावूक आणि सुंदर क्षण होता. स्टेबिन, तुला माहित आहे की नुपूर माझी ‘जान’ आहे आणि मला खात्री आहे की ती तुझीही ‘जान’ आहे… अगदी आयुष्यभरासाठी!” बहीण सासरी गेल्याची रुखरुख व्यक्त करताना क्रितीने एक मजेशीर पण हळवी गोष्टही सांगितली. ती म्हणाली की, नुपूर आता फक्त २० मिनिटांच्या अंतरावर राहणार आहे आणि ती वारंवार घरी येत राहील, तरीही तिच्याशिवाय घर रिकामं वाटेल. पण नुपूर आता दोन घरांमध्ये आनंद पसरवेल, याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचेही तिने नमूद केले. स्टेबिन बेन आता सनॉन कुटुंबाचा मुलगा नुपूरचा पती आणि प्रसिद्ध गायक स्टेबिन बेन याचे स्वागत करताना क्रितीने त्याला हक्काने ‘भाऊ’ मानले आहे. तिने म्हटले, “स्टेबिन, तू गेल्या ५ वर्षांहून अधिक काळापासून आमच्या कुटुंबाचा भाग आहेस. प्रत्येक सरत्या वर्षासोबत आपलं नातं अधिक घट्ट झालं आहे. ‘आय लव्ह यू स्टेबू!’ मला माहित आहे की मला आयुष्याभरासाठी एक हक्काचा भाऊ आणि मित्र मिळाला आहे.” असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे.