Mustafizur Rahman will miss 8 days in IPL 2026 : आयपीएलच्या १९ व्या हंगामाचा बिगुल २६ मार्चपासून वाजण्याची शक्यता आहे. १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे झालेल्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) मोठी बोली लावत आपला संघ मजबूत केला. मात्र, हंगाम सुरू होण्यापूर्वीच केकेआरच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संघाचा नवा प्रमुख वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आयपीएल २०२६ च्या मध्यंतरात मायदेशी परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निर्णय – बांगलादेश संघ एप्रिल महिन्यात आपल्या घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बांगलादेश क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष नजमुल अबेदीन यांनी ‘क्रिकबझ’ला दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफिजुरला आयपीएलसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले असले, तरी या महत्त्वाच्या मालिकेसाठी त्याला ८ दिवस मायदेशी राहावे लागेल. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे गणित – बांगलादेशसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्यासाठी बांगलादेशला आयसीसी क्रमवारीत पहिल्या ८ संघांमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे. सध्या बांगलादेश १० व्या स्थानावर आहे. २०२५ मध्ये खेळलेल्या ११ एकदिवसीय सामन्यांपैकी त्यांना केवळ ३ सामन्यांत विजय मिळवता आला आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या शर्यतीत टिकण्यासाठी मुस्तफिजुरची उपस्थिती बांगलादेशसाठी अनिवार्य आहे. हेही वाचा – Yashasvi Jaiswal : जैस्वालची तब्येत अचानक बिघडली; दोन दिवसांत २ किलो वजन घटलं, नेमकं काय झालं? जाणून घ्या केकेआर संघाचे नुकसान काय? केकेआरने या लिलावात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला २५.२० कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून खरेदी केले, तर मुस्तफिजुर रहमानसाठी ९.२० कोटी रुपये मोजले आहेत. मुस्तफिजुर हा टी-२० क्रिकेटमधील एक चतुर गोलंदाज मानला जातो. त्याने आतापर्यंत आयपीएलमधील ६० सामन्यांत २८.४५ च्या सरासरीने ६५ बळी घेतले आहेत. स्पर्धेच्या मध्यंतरात मुस्तफिजुर अनुपलब्ध राहिल्यास केकेआरच्या गोलंदाजी विभागावर मोठा परिणाम होऊ शकतो.