Karnataka record 413 run chase in Vijay Hazare Trophy 2025 : २४ डिसेंबर २०२५ हा दिवस भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या ग्रुप-ए मधील लढतीत कर्नाटकने झारखंडचा पराभव करत लिस्ट-ए क्रिकेटमधील जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी रन चेज पूर्ण केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्याने चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. इशान किशनचे शतक ठरले व्यर्थ – प्रथम फलंदाजी करताना झारखंडने कर्णधार इशान किशनच्या झंझावाती १२५ धावांच्या जोरावर ५० षटकांत ४१२ धावांचा डोंगर उभा केला होता. किशनच्या या आक्रमक शतकामुळे झारखंड सहज विजय मिळवेल असे वाटत होते. कर्नाटकसमोर विजयासाठी ४१३ धावांचे अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य होते. देवदत्त पडिक्कलची झुंजार खेळी – लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकच्या फलंदाजांनी निर्भय वृत्तीचे दर्शन घडवले. सलामीवीर देवदत्त पडिक्कलने १४७ धावांची मॅरेथॉन खेळी करून विजयाचा पाया रचला. त्यानंतर अभिनव मनोहर (५६) आणि ध्रुव प्रभाकर (४०) यांनी सहाव्या विकेटसाठी ८८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत सामना कर्नाटकच्या बाजूने झुकवला. कर्नाटकने हे लक्ष्य अवघ्या ४७.३ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात गाठून नवा इतिहास रचला. हेही वाचा – Temba Bavuma : बुमराहच्या ‘बुटक्या’ कमेंटवर बावुमाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘माफी मागितली, पण विसरलो नाही!’ मोडीत काढले जुने विक्रम – या विजयामुळे कर्नाटकने आंध्रा संघाने २०१२ मध्ये गोवा विरुद्ध केलेला ३८४ धावांच्या यशस्वी पाठलागाचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात मोठे यशस्वी रन चेज: दक्षिण आफ्रिका: ४३५ धावा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००६) कर्नाटक: ४१३ धावा (विरुद्ध झारखंड, २०२५) क्वीन्सलँड: ३९९ धावा (विरुद्ध तस्मानिया, २०१४) हेही वाचा – Year Ender 2025 : कसोटी ते आयपीएल: २०२५ मधील ‘न भूतो न भविष्यती’ ५ मोठे रेकॉर्ड्स कर्नाटकचा हा विजय केवळ भारतापुरता मर्यादित नसून, जागतिक स्तरावर दक्षिण आफ्रिकेच्या ऐतिहासिक ४३५ धावांच्या पाठलागानंतरचा दुसरा सर्वात मोठा यशस्वी रन चेज ठरला आहे. याच दिवशी बिहारनेही धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय मिळवून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला.