Raj Thackeray | Uddhav Thackeray | Girish Mahajan – पावसाळा सुरू झाला की बेडकं बाहेर यावीत तसे निवडणुका आल्या की, ठाकरे बंधूंची भाषणे आणि नकला सुरू होतात. कितीही भाषणे केली तरी लोक त्यांना स्वीकारत नाहीत; कारण लोकांचा विश्वास भाजपवर आहे. या निवडणुकीत राज्यातील एकातरी मोठ्या महापालिकेत ठाकरे बंधू आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सत्ता आणून दाखवावी, असे थेट आव्हान गिरीश महाजन यांनी रविवारी दिले. निवडणुका आल्या की ठाकरे बंधूंना मुंबई संकटात असल्याची आठवण होते. ते पाच वर्षे घरात बसतात आणि निवडणूक आली की भाषणे आणि नकला सुरू करतात. लोकही त्यांच्या सभांना गर्दी करून स्वत:चे मनोरंजन करून घेतात. परंतू त्यांना मतदान करीत नाहीत. महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा एकही आमदार निवडून आला नाही. उद्धव ठाकरेंना वीस आमदारही निवडून आणता आले नाहीत, असा चिमटाही गिरीश महाजनांनी काढला. आम्हाला येथील कुठली मोठी झाडे तोडायची नाहीत. काही झुडपे तोडायची आहेत. पण त्यासंदर्भातही उच्च न्यायालयात किस चालू आहे. उच्च न्यायालाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल, असेही महाजनांनी स्पष्ट करताना तपोवनच्या मुद्द्यावर सारवासारव केली. त्या रस्त्यांवर खड्डा पडणार नाही… गेल्या सिंहस्थात नाशिकला सहा हजार कोटींचा निधी मिळाला होता. यंदा सुमारे ३० हजार कोटींची कामे होत आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची यंदा बरीच चर्चा झाली. यापुढे डांबरी रस्ते करायचेच नाहीत असा निर्णय सरकारने घेतला आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्ते काँक्रीटचे करण्यात येणार असून, पुढील २५-३० वर्षे त्यावर खड्डे पडणार नाहीत, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.