Chief Minister Devendra Fadnavis : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीकडून मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकांसाठी रणनिती आखली जात आहे. तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या बैठका देखील होत आहेत. मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युतीची केवळ घोषणाच करणे बाकी आहे. महाविकास आघाडीने मतचोरीवरून रान उठवत सरकारवर हल्लाबोल केला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे हे या मुद्यावरून आक्रमक झाले होते. त्यांनी या प्रकरणी आपल्या भाषणातून सरकारला धारेवर धरले होते. त्यामुळे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना किंवा महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल महत्वाचे विधान केले आहे. राज ठाकरे यांना चिंतन करावे लागेल. उद्धवजी असतील महाविकास आघाडी असेल या कोणाचेही त्यांच्यावर प्रेम नाही. त्या त्या वेळची पॅालिटिकल आवश्यकता म्हणून टीका करायला एक वक्ता मिळतो म्हणून राज ठाकरेंचा ते उपयोग करतात. आता राज ठाकरेंना कोणासोबत राहायचं आहे त्यांना निर्णय घ्यायचा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, आमचे संबंध आहेत मैत्री आहे ती राहते. ते माझ्यावरही टीका करतात मीही कधी त्यांच्यावर टीका करतो. वैयक्तिक संबंध आणि राजकीय संबंध यातला एक फरक असतो, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. पॅालिटिकल स्पेस आम्ही तिघांनी मिळून व्यापली आता त्यांना ज्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा फायदा दिसेल तिथे ते जातील आता कदाचित त्यांना वाटत असेले आमच्याकडे जागा नाही आणि खरंच ते आहे. महाराष्ट्रातील पॅालिटिकल स्पेस आम्ही तिघांनी मिळून व्यापली आहे. त्यामुळे आमच्याकडे खूप काही स्कोप आहे असे वाटत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे त्यांना वाटले असले इकडे नाही तिकडे जावे म्हणून ते तिकडे चाललेयत, असेही फडणवीस म्हणाले. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. विरोधी पक्ष नेत्याच्या नावाची चर्चा नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. आठवडाभर होणाऱ्या या अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंह इतर प्रश्नांवर विरोधक आक्रमक होणार असल्याची शक्यता आहे. तसेच विरोधीपक्ष नेत्याबाबतही चर्चा सुरू असून, ठाकरेसेनेचे आमदार भास्कर जाधव यांंच्या नावाची चर्चा आहे. हेही वाचा : खंबाटकी घाटात अपघात! ब्रेक निकामी झाल्याने ट्रकने ७ गाड्या उडवल्या; ट्रक चालक ताब्यात