Ji Ram Ji bill passed | Lok Sabha | Shivraj Singh Chouhan – देशातील ग्रामीण जनतेला दोन दशके रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (मनरेगा) नाव आणि स्वरूप बदलणारे भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) म्हणजेच व्हीबी-जी राम-जी हे विधेयक अखेर गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला. यावेळी निषेध म्हणून विरोधकांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अंगावर कागद फेकले. यानंतर विरोधी खासदारांच्या गोंधळादरम्यान सरकारने हे विधेयक पारित केले. हे विधेयक सादर करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले, मनरेगा हे महात्मा गांधींच्या नावावर नव्हते. ते नरेगा होते. 2009 च्या निवडणुका आल्या तेव्हा निवडणुका आणि मतांसाठी त्यांना (काँग्रेस) महात्मा गांधींची आठवण आली. त्यानंतर त्यामध्ये महात्मा गांधींचा समावेश करण्यात आला, असा दावा त्यांनी केला. विरोधी पक्ष बापूंच्या विचारांची हत्या करत आहे. बुधवारी (17 डिसेंबर) मध्यरात्री 1.30 वाजेर्पर्यंत मी सर्व सदस्यांची मते ऐकली. पण, आता ते आमचे काही ऐकूनच घेत नाहीत. फक्त बोलायचे, समोरच्या बाकावरील खासदारांचे काही ऐकूनच घ्यायचे नाही, हीदेखील एक प्रकारची हिंसा आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले. बापू आमच्यासाठी आदर्श आहेत. ते आम्हाला प्रेरणा देतात. आम्ही महात्मा गांधींच्या विचारांवर चालत आहोत. म्हणूनच भाजपने आपल्या पंचनिष्ठेमध्ये महात्मा गांधीजींच्या समाजिक, आर्थिक विचारांना सर्वप्रथम स्थान दिले आहे. हा देश आमच्यासाठी फक्त जमिनीचा एक तुकडा नाही. हा देश आमच्यासाठी एक जीवंत राष्ट्रपुरुष आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, लोकसभेत व्हीबी-जी राम जी विधेयकावर 14 तास चर्चा झाली. कामकाज पहाटे 1.35 पर्यंत सुरु होते. 98 खासदारांनी चर्चेत भाग घेतला. 20 वर्षे जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा प्रस्तावित कायदा स्थायी समितीकडे पाठवावा, अशी विरोधकांची मागणी होती.