Jemimah Rodrigues share childhood incident : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि २०२५ च्या वनडे वर्ल्ड कप विजयाची नायिका जेमिमा रॉड्रिग्ज सध्या चर्चेत आहे. २०२६ च्या महिला प्रीमियर लीग (WPL) साठी दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी तिची निवड झाली आहे. मात्र, या मोठ्या जबाबदारीपूर्वी जेमिमाने तिच्या बालपणातील एक अत्यंत धक्कादायक आठवण शेअर केली आहे, ज्यामध्ये ती मृत्यूच्या दारातून थोडक्यात बचावली होती. ‘चप्पल मारण्याचा’ खेळताना घडला थरार – ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या लोकप्रिय कार्यक्रमात बोलताना जेमिमाने ८ व्या वर्षी घडलेला एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, “आम्ही चुलत भावंडं चर्चमध्ये गेलो होतो. मोठी माणसं आत कार्यक्रमात होती आणि आम्ही मुलं बाहेर खेळत होतो. आम्ही एकमेकांना चप्पल मारण्याचा खेळ खेळत होतो. माझ्या चुलत बहिणीने फेकलेली चप्पल पकडण्यासाठी मी ‘हिरोगिरी’ करायला गेले आणि माझा तोल जाऊन मी थेट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळले.” त्या महिलेमुळे वाचले प्राण! जेमिमा जेव्हा पहिल्या मजल्यावरून खाली पडली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा काळजाचा ठोका चुकला होता. “मी इतक्या उंचावरून पडले होते की, माझ्या बहिणीला वाटलं मी आता जिवंत नाही. पण नशिबाने खाली एक महिला बसली होती आणि मी थेट त्यांच्या डोक्यावर पडले. त्या महिलेमुळे माझ्या जीवाला कोणताही धोका झाला नाही आणि मला साधी दुखापतही झाली नाही,” असे जेमिमाने हसत सांगितले. हेही वाचा – SG Ends Sponsorship : बांगलादेशला मोठा फटका! ‘एसजी’ कंपनीने बांगला क्रिकेटपटूंशी तोडले संबंध; आता प्रायोजकत्वही गेले वर्ल्ड कपची हिरो आता दिल्लीची ‘कॅप्टन’ – जेमिमासाठी २०२५ हे वर्ष स्वप्नवत ठरले आहे. तिने यंदा भारताला विश्वविजेते बनवण्यात तिने मोलाची भूमिका बजावली. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने ठोकलेल्या १२७ धावा निर्णायक ठरल्या. तिच्या याच जबरदस्त कामगिरीचे फळ म्हणून दिल्ली कॅपिटल्सने मेग लॅनिंगनंतर आता जेमिमाकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.