Jemimah Rodrigues Record in WPL : महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाला (WPL 2026) सुरुवात झाली असून, पहिल्याच डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची नवी कर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज हिने इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच जेमिमाच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. स्मृती मानधनाला टाकले मागे – जेमिमा रॉड्रिग्ज आता डब्लूपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधनाच्या नावावर होता. जेमिमाने वयाच्या २५ वर्षे १२७ व्या दिवशी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व स्वीकारून हा मान मिळवला. स्मृती मानधनाने २०२३ च्या हंगामात २६ वर्षे २३० दिवस वय असताना नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. अनुभवी खेळाडू असूनही जेमिमावर विश्वास – गेल्या तीन हंगामात मेग लॅनिंग दिल्लीचे नेतृत्व करत होती. मात्र, यावर्षी दिल्लीने लॅनिंगला रिलीज केल्यानंतर जेमिमाकडे कर्णधारपद सोपवले. संघात लॉरा वोल्वार्ड आणि मारिजन काप यांसारख्या अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू असूनही, फ्रँचायझीने जेमिमाच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर विश्वास दाखवला आहे. जेमिमाने आतापर्यंत डब्लूपीएलमधील २७ सामन्यांत १३९.६६ च्या स्ट्राईक रेटने ५०७ धावा केल्या आहेत. हेही वाचा – GG vs UPW : गुजरात जायंट्सचा ऐतिहासिक श्रीगणेशा! तीन वर्षांचा वनवास संपला; यूपी वॉरियर्सची झुंज अपयशी ‘रनर अप’चा शिक्का पुसणार का? दिल्ली कॅपिटल्सचा संघ डब्लूपीएलच्या गेल्या तिन्ही मोसमांत ‘रनर अप’ (उपविजेता) राहिला आहे. जेतेपदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली आहे. आता विश्वविजेत्या भारतीय संघाची सदस्य असलेल्या जेमिमा रॉड्रिग्जकडे दिल्लीला पहिलेवहिले जेतेपद मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आहे. मुंबईविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात तिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत आपल्या मोहिमेची सकारात्मक सुरुवात केली.या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर हिने वादळी फलंदाजीचे दर्शन घडवले आहे. हेही वाचा – Rishabh Pant Injury : टीम इंडियाला पहिल्या वनडेपूर्वी मोठा धक्का! सराव सत्रात स्टार खेळाडूला दुखापत मुंबईने उभारला १९६ धावांचा डोंगर – हरमनप्रीत आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांच्या तडाखेबंद अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार हरमनप्रीत कौरने आक्रमक पवित्रा घेत शेवटच्या षटकात सलग ४ चौकार लगावत तब्बल १९ धावा कुटल्या. तिने ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ७४ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने नॅट सायव्हर-ब्रंटनेही दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तिने ४६ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने ७० धावांची आश्वासक खेळी केली. या दोघींच्या भागीदारीमुळे मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी १९६ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले आहे.