जम्मू – लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये चकमक झडली. किश्तवाड जिल्ह्यातील त्या घटनेत ३ जवान जखमी झाले. जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्करी जवान नियमितपणे दहशतवादविरोधी मोहिमा राबवत आहेत. अशाच एका शोधमोहिमेवेळी सुरक्षा जवान आणि दहशतवादी आमनेसामने आले. त्यातून किश्तवाडच्या दुर्गम जंगलव्याप्त भागात दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. चकमकस्थळी २ ते ३ दहशतवादी असण्याची शक्यता आहे. ते दहशतवादी परदेशी नागरिक असून पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद संघटनेचे सदस्य असल्याचे समजते. चकमकीनंतर संबंधित ठिकाणी आणखी सुरक्षाबळ धाडण्यात आले. त्यामध्ये लष्करी जवान, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांचा समावेश आहे. चकमकीत सामील दहशतवाद्यांच्या खात्म्याचे उद्दिष्ट सुरक्षा दलांनी समोर ठेवले आहे. त्यामुळे किश्तवाडमधील मोहीम आणखी काही काळ चालू राहण्याची शक्यता आहे. चालू वर्षातील ही सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जम्मू विभागात झडलेली तिसरी चकमक आहे.