Jamkhed case : जामखेडच्या खर्डा रस्त्यावर असलेल्या एका लॅाजमध्ये कला केंद्रात नर्तिका म्हणून काम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यदेह आढळून आल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. दिपाली पाटील (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणात भाजपचा माजी नगरसेवक संदीप गायकवाडचे नाव समोर आले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवरून ट्वीट करत महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला या घटनेची माहिती नाही. कोणीही असेल पोलीस तपास करतील. देवाभाऊ कोणाला ही माफी देणार नाही. आमच्या पक्षाचे असले तरी सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे. लग्नासाठी जबरदस्तीचा दबाव आणल्यामुळे दिपाली पाटील हिने आपल्या आयुष्याचा शेवट केला असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संदीप गायकवाडविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याची कसून चौकशी पोलीस करत आहेत. तो भाजपाचा माजी नगरसेवक आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रोहित पवारांचा इशारा दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी, असे सवाल उपस्थित करत अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत, असेही रोहित पवार म्हणाले. हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. हेही वाचा : इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लवकरच पूर्ण होणार; फडणविसांनी थेट तारीख सांगितली…