सासवड : सासवड नगरपरिषदेची उपनगराध्यक्षपदाची निवडणूक व नामनिर्देशित सदस्य निवडणूकीसाठी पहिली सर्वसाधारण सभा पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा आनंदीकाकी चंद्रकांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये पार पडली. निवडीत मनोहर जगताप यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर मात करीत उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. सचिन भोंडे व मयूर चौखंडे हे नामनिर्देशित सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले. शिवसेनेच्या वतीने उपनगराध्यक्षपदासाठी प्रितम म्हेत्रे व भाजपाच्या वतीने मनोहर जगताप यांची अर्ज दाखल केला. छाननीनंतर दोन्हीही अर्ज वैध असल्याने हात वर करून मतदान घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा जगताप यांनी सांगितले. मतदान प्रक्रियेनंतर म्हेत्रे यांना ९ मते व जगताप यांना १४ मते मिळाल्याने नगराध्यक्षा जगताप यांनी मनोहर जगताप यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष, नवनिर्वाचित नामनिर्देशित सदस्य व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय जगताप यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, भाजपचे गटनेता अजित जगताप, सासवड नगरपरिषद शिवसेना पार्टीचे गटनेता मंदार गिरमे, नगरसेवक माधुरी राऊत, लीना वढणे, बाळासाहेब भिंताडे, शितल भोंडे, ज्ञानेश्वर जगताप, सोपान रणपिसे, स्मिता जगताप, सुहास म्हेत्रे, रत्ना जगताप, अर्चना जगताप, राजन जगताप, स्मिता उमेश, वैभव टकले, प्रितम म्हेत्रे, दीपाली जगताप, प्रदीप राऊत, प्रियांका जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, शिल्पा जगताप, हेमलता ईनामके उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक नूतन जाधव, सहायक कार्यालय अधीक्षक अतुल दिसले यांनी सभेचे कामकाज पाहिले. नामनिर्देशित सदस्यपदी भोंडे, चौखंडे शिवसेनेतर्फे गटनेता मंदार विजय गिरमे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र सादर करुन सचिन भोंडे यांच्या नावाची शिफारस केली होती. भाजपातर्फे गटनेता अजित जगताप यांनी नामनिर्देशित सदस्य पदासाठी मयूर चौखंडे यांच्या नावाची शिफारस केली. उमेदवारांचे अर्ज व छाननीचे पदनिर्देशित अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी यांनी काम पाहिले. दोन्हीही अर्ज वैध झाल्यानंतर सचिन भोंडे व मयूर चौखंडे हे नामनिर्देशित सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले.