मुंबई : राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असतानाच राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात नाशिक सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले असून, त्यांच्या मंत्रिपदावर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे दिल्लीत असल्याच्या बातम्या आणि करुणा मुंडे यांच्या खळबळजनक आरोपांमुळे मुंडे भाजपात प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या नाशिक सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली असून, त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. कोकाटे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून, शुक्रवारी (१९ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. मात्र, तातडीची सुनावणी नाकारल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे. धनंजय मुंडे दिल्लीत; भाजप नेत्यांची भेट? कोकाटे यांच्या संकटानंतर धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात मुंडे मंत्रीपदाच्या ‘घरवापसी’साठी प्रयत्न करत असल्याचा तर्क लढवला जात आहे. मात्र, याबाबत मुंडे किंवा त्यांच्या पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट या सर्व घडामोडींमध्ये करुणा मुंडे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, धनंजय मुंडे लवकरच भाजपमध्ये जातील असं वाटतं आहे. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत, वाल्मिक कराड प्रकरणातही अडचण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते दिल्लीला गेले आहेत. करुणा मुंडे यांनी स्वतः शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ५० पक्षांना आवाहन करणार असल्याचं सांगितलं आहे. करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील वैयक्तिक वाद जुना आहे. करुणा यांनी यापूर्वी मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून, न्यायालयातही प्रकरणे सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या या विधानाला राजकीयदृष्ट्या फार गांभीर्याने घेतलं जात नाही, मात्र कोकाटे प्रकरण आणि मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आलं आहे.