Ireland Squad Announce for T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होण्यास आता महिन्याभरापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच संघांनी कंबर कसली असून आयर्लंडनेही आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अनुभवी पॉल स्टर्लिंग याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, तर लॉर्कन टकर याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल. संघात मोठे बदल आणि युवा खेळाडूंचा प्रवेश – २०२४ च्या विश्वचषकाच्या तुलनेत आयर्लंडने आपल्या संघात तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. २२ वर्षीय टॉप ऑर्डर फलंदाज आणि ऑफ स्पिनर टिम टेक्टर याला संघात स्थान मिळाले आहे. याव्यतिरिक्त, २३ वर्षीय डावखुरा फलंदाज बेन कॅलिट्झ आणि डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू हम्फ्रीज या युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. निवड समितीचा विश्वास – आयर्लंडचे नॅशनल मेन्स सिलेक्टर अँड्र्यू व्हाईट यांनी संघ निवडीवर समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “आम्ही या विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत आहोत. २०२२ चा विश्वचषक आमच्यासाठी संस्मरणीय होता, मात्र २०२४ मध्ये आमची कामगिरी खालावली होती. गेल्या १८ महिन्यांत आम्ही विविध रणनीती आणि खेळाडूंच्या भूमिकांवर काम केले आहे. सध्या आमचा संघ योग्य संतुलनात असून आम्ही चांगल्या निकालाची अपेक्षा करत आहोत.” हेही वाचा – Jemimah Rodrigues : “मी मेली असंच बहिणीला वाटलं…”; जेमिमाने सांगितला पहिल्या मजल्यावरून पडल्याचा तो भयानक अनुभव! आयर्लंडचे आव्हान आणि गटवारी – गेल्या विश्वचषकात आयर्लंडला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. मात्र, या वेळी संघ आपली प्रतिमा सुधारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आयर्लंडच्या मोहिमेची सुरुवात ८ फेब्रुवारीला कोलंबो येथे यजमान श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. आयर्लंडला ग्रुप ‘B’ मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या गटात यजमान श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि झिम्बाब्वे संघांचा समावेश आहे. हेही वाचा – SG Ends Sponsorship : बांगलादेशला मोठा फटका! ‘एसजी’ कंपनीने बांगला क्रिकेटपटूंशी तोडले संबंध; आता प्रायोजकत्वही गेले टी-२० वर्ल्ड कपसाठी आयर्लंडचा संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, बेन कॅलिट्झ, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हम्फ्रीज, जोश लिटल, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, लॉर्कन टकर (उपकर्णधार), बेन व्हाईट आणि क्रेग यंग.