मुंबई : मुंबई महापालिकावर महायुतीचा महापौर बसणार असल्याचे विधान महायुतीमधील नेत्यांकडून केले जात आहे. महापौर भाजपचा होईल की शिवसेनेचा हे महत्वाचं नाही तर मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाररहित प्रशासन देणं, मुंबई शहराचा विकास घडवणं हे महत्वाच असल्याचे मोठं विधान भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी केले होते. त्यानंतर आता मुंबईच्या महापौरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचे भाजपच्या बड्या नेत्याने केलेल्या विधानामुळे स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्यापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना पक्षांनी एकत्रित लढवली होती. भाजप मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपचा महापौर हे आता निश्चित मानले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईत भाजपचाच महापौर बसवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून, त्यानुसार येत्या 30 जानेवारीला मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर कारभाराची सूत्रे हाती घेणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. याबाबत भाजपच्या एका बड्या नेत्याने दिल्लीतील अनौपचारिक गप्पांमध्ये खुलासा केला आहे. आज भाजपसाठी मोठा दिवस आहे, याचे कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर नितीन नबीन यांच्या नावावर शिक्कामोर्तेब झाला असून ते भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. यानिमित्ताने भाजपचे मुंबई आणि महाराष्ट्रातील नेते दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. याच नेत्यांच्या गोटातून येत्या 30 तारखेला भाजपचा महापौर मुंबईची सूत्रे हातात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदेंचे दबावतंत्र? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी 114 नगरसेवकांचे संख्याबळ गरजेचे असणे आवश्यक आहे. त्यामुळे भाजपला शिंदेंसेनेच्या २९ नगरसेवकांना सोबत घेणे गरजेचे असणार आहे. मात्र, शिंदेंनी मोठी खेळी करत आपल्या नगरसेवकांना ताज हॅाटेलमध्ये ठेवले आहे. या नगरसेवकांचा आणखी काही दिवस मुक्काम वाढला आहे. एकप्रकारे दबाव तंत्राचा वापर महापौर पदासाठी शिदेंनी केला असल्याची चर्चा आहे. मात्र, याचा काही परिणाम झाला नसल्याची चर्चा रंगली आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपने दीर्घकाळ प्रतीक्षा केली आहे. त्यामुळे यंदा महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे मित्रपक्षांना समजावून सांगा, असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला होता. त्यामुळे भाजप मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर बसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. चर्चेत अनेकजण पण… २२ जानेवारीला मुंबई महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर नेमके कुणाला महापौर पदासाठी संधी द्यायची हे निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. महापौर पदासाठी चर्चेत अनेक नावं असली तरी सर्व खेळ हा आरक्षणावर असणार आहे. येत्या दोन दिवसांत महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकाचे शक्तिप्रदर्शन करत एकत्र नोंदणी कोकण भवन येथे होणार आहे. कोकण भवन येथील नगर विकास मंत्रालयाच्या कार्यालयात भाजप आणि शिवसेनेचे विजयी नगरसेवक एकत्र पक्ष गट स्थापनेची अधिकृत नोंदणी करणार आहेत. हेही वाचा : सायना नेहवालचा मोठा निर्णय; बॅडमिंटनच्या कारकिर्दीला दिला पूर्णविराम