मुंबई : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ते मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. नागपूर येथे नुकतेच संपलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते सक्रिय सहभागी होते. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी रात्री त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेची माहिती समोर येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ रुग्णालय गाठले आणि उदय सामंत यांची भेट घेतली. शिंदे यांनी सामंत यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली. तसेच, उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली. योग्य उपचार करून लवकर बरे करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. यावेळी शिंदे यांनी सामंत यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला. मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्या असून, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या (१७ डिसेंबर) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याने कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देताना म्हटले, उदय सामंत हे अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष मंत्री आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, ही अतिशय दिलासादायक बाब आहे. रत्नागिरीसह राज्यभरातील शिवसेना कार्यकर्त्यांकडून उदय सामंत यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते लवकरच पुन्हा जनसेवेत रुजू होतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. या घटनेने महायुती सरकारातील एकजूट पुन्हा एकदा दिसून आली आहे. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांच्या नेमक्या आजाराबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.