indigo flight cancellation : इंडिगोने दिल्ली आणि मुंबई विमानतळांवरून २२० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. यामध्ये, मुंबई विमानतळावरून किमान ११२ आणि दिल्ली विमानतळावरून १०९ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कामकाज सुरळीत करण्याचे प्रयत्न सहाव्या दिवशीही सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांत चाललेल्या या गोंधळामुळे शेकडो उड्डाणे रद्द झाली आहेत. याचा हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे. शुक्रवारी नेहमीच्या २,३०० उड्डाणांपैकी सुमारे १,६०० उड्डाणे रद्द केल्यानंतर कंपनीकडुन अडचणीमध्ये सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी फक्त ७०० उड्डाणे चालवण्याचे मुख्य उद्दिष्ट नेटवर्क, सिस्टीम आणि रोस्टर रीबूट करणे होते जेणेकरून शनिवारी जास्त उड्डाणे, स्थिरता सुधारली असल्याचे इंडिगोकडुन स्पष्टीकरण देण्यात आले. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि अकाउंटेबल मॅनेजर पोर्केरास यांना डीजीसीएच्या नोटिसा मिळाल्या. ज्यात मोठ्या प्रमाणात उड्डाणे विस्कळीत झाल्याबद्दल २४ तासांच्या आत स्पष्टीकरण मागितले. मोठ्या प्रमाणात ऑपरेशनल अपयशी नियोजन, देखरेख आणि संसाधन व्यवस्थापनातील महत्त्वपूर्ण त्रुटी दर्शवितात, असे एल्बर्स आणि पोर्क्वेरास यांना पाठवलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे. एअरलाइनसाठी मंजूर केलेल्या फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी सुधारित आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेशी व्यवस्था न करणे हे उड्डाणामध्ये अडचण येण्याचे मुख्य असल्याचे नमूद केले आहे.