Rohit Yashaswi Partnership break 25 year old : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना ९ गडी राखून जिंकत ही मालिका २-१ ने नावावर केली. भारताला विजयासाठी २७१ धावांचे आव्हान मिळाले होते, जे रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने केलेल्या उत्कृष्ट भागीदारीमुळे सहज गाठता आले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची विक्रमी भागीदारी रचत २५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. रोहित आणि यशस्वी या जोडीने सुरुवातीला संयमाने फलंदाजी केली आणि नंतर सेट होताच धावांचा वेग वाढवला. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज त्यांच्यासमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरले. अखेर केशव महाराजने रोहित शर्माला (७५ धावा) बाद करून ही १५५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. २५ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम – रोहित-यशस्वीची जोडी आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सलामीची भागीदारी करणारी भारतीय जोडी ठरली आहे. या दोघांनी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीचा २५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. सचिन-गांगुलीने २००० साली वडोदरा येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या विकेटसाठी १५३ धावांची भागीदारी केली होती. हेही वाचा – IND vs SA : जैस्वालच्या शतकाने डी कॉकच्या खेळीवर फेरलं पाणी, निर्णायक लढतीत टीम इंडियाचा दणक्यात विजय! रोहित शर्माचे घरच्या मैदानावर ५००० वनडे धावा पूर्ण – या सामन्यात रोहित शर्माने ७५ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली, जे त्याचे या मालिकेतील दुसरे अर्धशतक होते. या खेळीच्या जोरावर रोहितने भारतात खेळताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या. यासह, मायदेशात ५००० हून अधिक धावा करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनीच हा पराक्रम केला आहे. हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा पराक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला चौथा भारतीय धोनीप्रमाणेच जैस्वालने विशाखापट्टणमवर गाजवले वर्चस्व – जयस्वालच्या शतकामुळे २० वर्षांपूर्वीच्या एमएस धोनीच्या कामगिरीची आठवण झाली. खरं तर, २००५ मध्ये एमएस धोनीनेही विशाखापट्टणममध्ये पहिले एकदिवसीय शतक झळकावले होते. त्यानंतर धोनीने पाचव्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १४८ धावा केल्या. दरम्यान, जयस्वालने चौथ्या सामन्यात नाबाद ११६ धावा (१२१ चेंडू, १२ चौकार, २ षटकार) करून टीम इंडियाला ९ विकेटने विजय मिळवून दिलाच, शिवाय या फॉरमॅटमध्ये त्याचा दावाही मजबूत केला.