IND vs SA India beat South Africa by 101 runs : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना कटक येथे पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयात भारताच्या गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १२.३ षटकांत ७४ धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेची अत्यंत खराब फलंदाजी – भारताने प्रथम फलंदाजी करताना खराब सुरुवातीनंतर हार्दिक पंड्याच्या अर्धशतकाच्या जोरावर ६ बाद १७५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आणि त्यांनी पॉवरप्लेमध्येच तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. यानंतर त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या, ज्यामुळे त्यांचा कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी इतकी खराब झाली की, त्यांच्या केवळ चार फलंदाजांनाच दोन अंकी धावसंख्या गाठता आली. डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक २२ धावा केल्या, तर कर्णधार एडेन मार्करमने १४, ट्रिस्टन स्टब्सने १४ आणि मार्को यानसेनने १२ धावांचे योगदान दिले. हेही वाचा – IND vs SA : हार्दिक पंड्याची हार्ड-हिटिंग! टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलं अनोखं शतक सर्व भारतीय गोलंदाजांना यश; बुमराहचा विक्रम भारताच्या गोलंदाजांनी या सामन्यात प्रभावी कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. विशेष म्हणजे, भारताच्या सर्वच गोलंदाजांना या सामन्यात यश मिळाले. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या, तर शिवम दुबे आणि हार्दिक पंड्याला प्रत्येकी एक विकेट्स मिळाली. हेही वाचा – IND vs SA : लुंगी एनगिडीचा कहर! गिल-सूर्या-अभिषेक स्वस्तात माघारी, टीम इंडियाचा डाव अडचणीत या सामन्यात जसप्रीत बुमराहने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रम केला. अर्शदीप सिंगनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १०० विकेट्स घेणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. या दमदार विजयामुळे विश्वचषकाच्या तयारीसाठी टीम इंडियाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.