IND vs SA 1st ODI Pitch Report : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना उद्या, ३० नोव्हेंबर रोजी रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. टीम इंडियासाठी ही २०२५ मधील शेवटची वनडे मालिका आहे. २०२७ वर्ल्डकपच्या तयारीसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची असून, यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. तत्पूर्वी खेळपट्टी कशी कशी असेल? जाणून घेऊया. खेळपट्टीचा अंदाज: फलंदाज-गोलंदाजांना समान संधी रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील खेळपट्टीचा विचार केल्यास, येथे आतापर्यंत फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात जवळपास बरोबरीचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या मैदानावर आतापर्यंत ६ वनडे सामने खेळले गेले आहेत. यापैकी तीन वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर दोन वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय नोंदवला आहे. एक सामना रद्द झाला आहे. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूनेमदत मिळण्याची शक्यता आहे, मात्र खेळ जसजसा पुढे जाईल, तसतसे फिरकीपटूंची भूमिका खूप महत्त्वाची ठरेल. त्याचबरोबर या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २६० ते २६५ दरम्यान आहे, जी सध्याच्या क्रिकेटच्या दृष्टिकोनातून थोडी कमी आहे. त्यामुळे, जर प्रथम फलंदाजी करणारा संघ ३०० हून अधिक धावा करण्यात यशस्वी झाला, तर सामना अत्यंत रोमांचक होऊ शकतो. हेही वाचा –IND vs SA : प्लेइंग इलेव्हनचा सस्पेन्स संपला! ऋषभ-ऋतुराजला मिळणार का संधी? केएल राहुलने केलं स्पष्ट ‘टॉस’ ठरणार गेम चेंजर – पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होणार असल्यामुळे, या सामन्यात टॉसची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या ६ वनडे सामन्यांमध्ये टॉस जिंकणाऱ्या संघाने केवळ २ वेळा विजय मिळवला आहे, तर टॉस हरलेल्या संघाने ३ सामने जिंकले आहेत. हेही वाचा – IND vs SA : रोहितसोबत रांची वनडेत कोण उतरणार सलामीला? जैस्वाल की गायकवाड? जाणून घ्या तरीही, दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता असल्यामुळे, टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, जेणेकरून दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे होईल. रांचीची खेळपट्टी जरी धावा देणारी असली तरी, टॉस आणि फिरकी गोलंदाजांचे प्रदर्शन सामन्याचा निकाल ठरवण्यात निर्णायक ठरेल.