मेलबर्न : ऑस्ट्रेलियामध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी बंदी आजपासून लागू करण्यात आली. या बंदीचे पंतप्रधान ॲन्थनी अल्बानीज यांनी स्वागत केले आहे. आता सोशल मीडिया मुलांना नियंत्रित करणार नसून त्याऐवजी मुलांना नियंत्रण करण्याची जबाबदारी पालकांवर येणार असल्याचेही अल्बानीज यांनी म्हटले आहे. मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचे काम खूप अवघड असल्याचेही त्यांनी मान्य केले. सोशल मीडियाचा संपर्क तुटल्याने मुलांनी चिडचिड सुरू केल्याची तक्रार काही पालकांनी सुरू केली आहे. सोशल मीडियावर वय नोंदवण्यात मुलांनी बनवाबनवी केल्याचेही काही प्रकार उघडकीला आले आहेत. सोशल मीडियाच्या वापरावरील निर्बंध टाळण्यासाठी पळवाटा शोधण्यासाठी मोठ्या वयाची भावंडे आणि पालक देखील मुलांना मदत करतील, अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. ऑस्ट्लियातील पालकांना आता आपल्या मुलांची अधिक काळजी करावी लागणार नाही. आपल्या मुलांच्या हालचालींबाबत लक्ष ठेवण्याचा त्रास पालकांना होणार नाही, असेही अल्बानीज यांनी म्हटले आहे. संसदेत झालेल्या कायद्यानुसार आता ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही. अशा मुलांची सोशल मीडियावरील अकाऊंट बंद केली गेली नाहीत, तर फेसबुक, इंस्टाग्राम, किक, रेडिट, स्नॅपचॅट, थ्रेड्स, टिकटॉक, एक्स, यूट्यूब यांना बुधवारपासून ४९.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर (३२.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर) पर्यंत दंड आकारला जाईल.