Tejashwini Pandit : राज्यातील मुंबई महापालिकेसह २९ महापालिकांसाठी उद्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीची सुरु झालेली रणधुमाळी आता थांबणार आहे. काल प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी शेवटच्या दिवशी देखील त्याच जोशाने प्रचारमोहिम राबवित मतदारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न केला. खरंतर या महापालिका निवडणुका विविध कारणांमुळे सर्वाधिक चर्चेत राहिल्या. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणामुळे जनतेला विचार करायला भाग पाडले. निवडणुकीत घडलेल्या काही अनपेक्षित घटनांमुळे हीच का लोकशाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही सुरू आहे, त्यावर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रचार दौऱ्यात मनोरंजन विश्वातील मंडळींनी देखील सहभाग दर्शवला होता. कलाकार मंडळींनी देखील आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले. आपल्या रोखठोक बोलण्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहून भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका, असं म्हणत तिने नागरिकांना योग्य व्यक्तीला निवडून आणण्याचा आवाहन केले आहे. पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली तेजस्विनी पंडीत? ” आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी नगरसेवक असतात. म्हणूनच भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका. सतर्क रहा. योग्य, सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवारांना निवडून द्या.” असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. यासोबतच तिने आपला एक व्हिडीओ देखील इंन्स्टाग्रामवर रि-शेअर केला आहे. मनोरंजन विश्वातील खासकरून मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार आपली मत मांडत असतात, त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडित आहे. तिचा सोशल मीडियावर सतत वावर असतो. ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. सामाजिक तसेच राजकीय घडामोडींवर आपले मत जाहीरपणे मांडत असते. आता तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहून मतदारांना मतदान करताना जागृत राहण्याचे आवाहन केले आहे. हेही वाचा : मतदारांकडे Voter ID नसेल तरीही करता येणार मतदान; ‘ही’ १२ प्रकारची ओळखपत्रे धरली जाणार ग्राह्य