Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी राज्यभर खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा झटका दिला आहे. कराड यांनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून, ते सध्या बीड कारागृहातच राहतील. या प्रकरणात वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. कराड यांचे नाव समोर आल्यानंतर मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते, त्यानंतर त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. न्यायालयाने निकाल देताना नमूद केले की, प्राथमिक पुराव्यांवरून वाल्मिक कराड यांचा खंडणी प्रकरणात सहभाग, त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या या गुन्ह्यात भूमिका स्पष्ट दिसते. कॉल डेटा रेकॉर्ड (CDR), मोबाईल संभाषणे, कराड आणि इतर आरोपींमधील सततचा संपर्क, जप्त व्हिडीओ क्लिप्स, आवाजाच्या नमुन्यांची तपासणी आणि फॉरेन्सिक अहवाल या सर्व बाबींचा सविस्तर विचार करण्यात आला. या ठोस पुराव्यांमुळे जामीन देणे योग्य ठरणार नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. दरम्यान, अलीकडेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर धनंजय मुंडे यांनी “जनतेच्या न्यायालयात मी विजयी झालो” असे विधान केले होते आणि प्रचारात कराड यांचा उल्लेखही केला होता. मात्र, हायकोर्टाच्या या निर्णयामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, पुढील घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.