नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने 72 जागा जिंकत पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 62 जागांचा टप्पा भाजपने सहज ओलांडला असून, कोणाच्याही पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपला थेट आव्हान देत महापौरपदाचे स्वप्न पाहणाऱ्या शिंदेसेनेला मात्र केवळ 26 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यंदा मतदानाची टक्केवारी 57 टक्क्यांवर स्थिरावली असून, 2017 मधील 62 टक्क्यांच्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांची घट झाली आहे. घटलेल्या मतदानाचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. नाशिकची ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. उमेदवारी नाकारल्याने पक्षांतर्गत नाराजी असूनही भाजपने 72 जागा जिंकत आपली ताकद सिद्ध केली. भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार करून शिंदेसेनेचे मंत्री दादा भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आक्रमक प्रचार केला. मात्र, शिवसेनेला अपेक्षित 40 ते 50 जागांचा आकडा गाठता आला नाही. आता, याठीकाणी भाजपची एकहाती सत्ता निश्चित असली, तरी भाजपविरोधात लढलेली शिंदेसेना सत्तेत सहभागी व्हावे की विरोधी बाकावर बसून आक्रमक भूमिका घ्यावी, याबाबत संभ्रमात आहे. वरिष्ठांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवू, असे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपने एकहाती सत्ता खेचून आणत शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा पराभव केला असून, शिवसेनेची सत्तेची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत.