मुंबई : महायुतीतर्फे राज्यातील बहुतेक महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या जाणार असल्या तरी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) निवडणुकीत भाजप स्वबळावर उतरण्याचे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड वगळता इतर महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती एकत्र लढेल, असे जाहीर केले होते. मात्र, रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसीबाबत वेगळी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीत १०-१० हजार कार्यकर्त्यांपैकी फक्त १२२ जणांनाच संधी मिळते. जो कमळ चिन्हावर उभा राहील, त्यालाच मतदान करा. केंद्र आणि राज्याप्रमाणे महापालिकेतही भाजपचे सरकार आणले तर विकासकामे सहज मार्गी लागतील. १०० टक्के एकाच विचाराचे सरकार हवे.” चव्हाण यांच्या या वक्तव्याला ते ठाम असून, ते विचारपूर्वक केलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे केडीएमसी निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट स्वतंत्र लढण्याची शक्यता बळावली आहे. अंबरनाथ-बदलापूरमध्ये भाजपची बाजी अलीकडील नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाने ग्रामीण भागात चांगली कामगिरी केली, मात्र ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा पराभव झाला, जो खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा झटका मानला जातो. या पार्श्वभूमीवर केडीएमसीतही भाजप स्वबळावर लढण्यासाठी आग्रही असल्याचे चव्हाण यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.