लाहोर : ३- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दलच्या सर्व अफवा काल रात्री दूर झाल्या. त्यांच्या भगिनी डॉ. उझमा खान यांनी मंगळवारी रात्री आदियाळा तुरुंगात जाऊन इम्रान यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि प्रकृतीची चौकशी केली. इम्रान खान जिवंत आहेत. मात्र एकांतवासात ठेवल्यामुळे त्यांचा मानसिक छळ झाला आहे, असे डॉ. उझमा खान यांनी तुरुंगाबाहेर जमलेल्या पीटीआयच्या कार्यकर्त्यांना सांगितले. इम्रान यांची प्रकृती ठिकअसल्याचे दिसते आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्याभरापासून इम्रान खान यांना भेटण्यावर अघोषित बंदी घालण्यात आली होती. त्यांचे वकील, जॉक्टर, पीटीआयचे नेते आणि कुटुंबीयांनाही तुरुंग प्रशासनाने इम्रान यांची भेट घेण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे इम्रान खान यांच्या स्वास्थ्याविषयी उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. इम्रान यांची तुरुंगातच हत्या करण्यात आल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्यामुळे पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. इम्रान खान यांच्या ३ बहिणींपैकी डॉ. उझमा खान यांना इम्रान यांची भेट घेण्याची परवानगी दिली गेली होती. त्यानुसार डॉ. उझमा खान रात्री आदियाळा तुरुंगात जाऊन इम्रान यांना भेटून आल्या. पीटीआय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने संपूर्ण रावळपिंडी शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. तब्बल ८ किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला होता. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आणि स्थानिकांना जवळ ओळखपत्रे बाळगण्याची सूचनाही दिली गेली होती. पीटीआयच्या लोकप्रतिनिधींनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर निदर्शने करण्याचा प्रयत्नही केला होता.