Devendra Fadnavis : बिनविरोध निवडणुकीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “काहींना पोटदुखी झाली आहे. तुमको मिरची लगी तो मैं क्या करु?” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्याच टप्प्यात महायुतीच्या 21 जागा बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांकडून लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत आयोजित जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांकडे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यावर विरोधकांना इतकं दु:ख का होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महायुतीचे उमेदवार जिंकून आले की लगेच नवा ‘नरेटिव्ह’ पसरवण्याचं काम विरोधकांकडून सुरू होतं, अशी टीकाही त्यांनी केली. यापूर्वी संसदेत 35 खासदार बिनविरोध निवडून आले होते, त्यापैकी 33 खासदार काँग्रेसचे होते. तेव्हा लोकशाही जिवंत होती आणि आता महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर लोकशाहीची हत्या झाली, असं म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं, असा सल्ला फडणवीस यांनी दिला. कल्याण-डोंबिवली शहराची ओळख हिंदुत्ववादी असल्याचं सांगत त्यांनी विकासाचा आढावा घेतला. गेल्या 70 वर्षांत शहरांचा अपेक्षित विकास झाला नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला 50 हजार कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला. 2014 पूर्वी एमएमआर रिजनमधील शहरांना पुरेसा निधी मिळत नव्हता, पण महायुती सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपने एमएमआर रिजनसाठी 4 लाख कोटी रुपयांचा विकास निधी दिला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतदारांना आवाहन केलं की, 15 जानेवारीला कमळ आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर बटन दाबा. पुढील पाच वर्षे तुमची चिंता आम्ही करू. कल्याण-डोंबिवली ही एमएमआर रिजनमधील सर्वात चांगली महापालिका बनवू, अशी हमीही त्यांनी दिली.