कणकवली : आज २१ डिसेंबर राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायती अशा एकूण २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल जाहीर होत आहेत. ३ डिसेंबर आणि २० डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. निवडणुकीच्या निकालामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक शिगेला पोहचली होती. आज अखेर विजयाचा गुलाल कोण उधळणार हे ठरले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर निकालाच्या दिवशी ठाकरे गटाच्या उमेदवाराने मोठे विधान केले आहे. कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडीचे मुख्य शिलेदार आणि ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांनी ही माझी नगरपंचायतीची शेवटची निवडणूक आहे, मतदारांनी मला एकदा संधी द्यावी, असे विधान करत भावनिक आवाहन केले आहे. ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे, कारण ठाकरे गट (उबाठा) आणि राणे गट (महायुती) यांच्यात थेट स्पर्धा आहे. यामुळे विजयाच गुलाल कोण उधळणार हे आजच स्पष्ट होणार आहे. संदेश पारकर यांनी नगरपरिषदेसाठी झालेल्या मतदानावर भाष्य केले. आम्ही भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवलीचा नारा दिला होता. त्याला शहरवासियांनी उत्स्फूर्त साथ दिली असल्याचे पारकर यांनी सांगितले. निलेश राणे यांनी कणकवलीचे पालकत्व स्वीकारावे ही माझी भूमिका होती आणि आहे, असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. जनतेचा कौल मिळाला तर कणकवलीच्या विकासाचा शुभारंभ आम्ही नारळ वाढवूनच करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी अनेक नेत्यांची पतिष्ठा पणाला लागली असून मतदार राजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. संदेश पारकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द कणकवली कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी (GS) पदापासून सुरू झाली. ते कणकवली नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत. कणकवली नगरपरिषद मुख्य लढत समीर नलावडे (भाजप ) संदेश पारकर (उबाठा व शिंदे शिवसेना शहर विकास आघाडीच उमेदवार ) हेही वाचा : मतमोजणीपूर्वी ‘या’ तीन ठिकाणी भाजपचा विजय; महिलाराज असल्याचा निकाल समोर